![]()
सामान्य माणसाची दिवाळी वर्षातून एकदाच येते आणि चार दिवसांत खिसा रिकामा करून निघून जाते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र गेल्या वर्षभरात बाराही महिने दिवाळी सुरू होती. फरक इतकाच की, इथे फटाके शोभेच्या दारूचे नव्हते तर जिभेचे, कोलांटउड्यांचे आणि कुरघोड्यांचे होते! सत्तेत असलेल्या तिन्ही भावांनी आणि विरोधात बसलेल्या तिन्ही मित्रांनी एकमेकांच्या अंगणात इतके फटाके फोडले की, कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू, हे शोधण्यासाठी सामान्य मतदाराला भिंगाची गरज भासावी. पाहूयात, गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या या राजकीय आभाळात कोणकोणते नमुनेदार फटाके फुटले आणि कोणाकोणाचे कपडे मळके झाले..! गोगावलेंची पालकमंत्रिपदाची धुमसणारी वात! 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 200 पार मजल मारली आणि विरोधकांना अस्मान दाखवले. पण सत्तेचे लोणी खाताना स्वतःच्याच ताटात माशी पडणार नाही, तर ते राजकारण कसले? मंत्रिमंडळ विस्तार झाला, अनेकांच्या अंगावरचे नवे कोरे सूट कपाटातच राहिले. पण खरा राडा रंगला तो रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून! शिवसेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्रिपद इतके प्रिय झाले होते की, त्यांनी त्यासाठी नवस बोलायचेच बाकी ठेवले होते. पण समोर तटकरेंच्या रूपाने ‘राष्ट्रवादी’ भिंत होती. मग काय, सत्तेतल्याच दोन्ही गटांत शाब्दिक लवंगी फटाक्यांच्या माळा फुटू लागल्या. गमतीची गोष्ट म्हणजे, सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे विधान परिषदेला उभे राहिले, तेव्हा याच भांडणाऱ्या मित्रांनी गळ्यात गळे घालून त्यांना निवडून दिले आणि गुलाल पुसताच पुन्हा एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढायला सुरुवात केली! यालाच म्हणतात ‘खरे राजकीय मित्र प्रेम’. अखेर ऑगस्ट 2026 मध्ये गोगावलेंच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रिपदाची माळ पडली आणि वर्षभर धुमसणारी ही वात एकदाची शांत झाली! अरेरे! तिजोरीची चावीच हातातून गेली! दिवाळीत ‘लक्ष्मी फटाका’ मोठा मानला जातो, पण राजकारणात खरी लक्ष्मी असते ती ‘अर्थखात्यात’! देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजितदादांकडे ही तिजोरीची चावी होती. पण जानेवारी 2026 मधील त्या दुर्दैवी अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी ही चावी हळूच स्वतःच्या कमरेला अडकवून घेतली. मग काय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जीव कासावीस झाला! तिजोरी परत मिळावी म्हणून भेटीगाठींचे दौरे झाले, टीव्हीच्या कॅमेऱ्यांसमोर “अर्थखाते आमचेच!” म्हणून गळा काढण्यात आला. पण भाजपने काही दाद दिली नाही. हीच संधी साधत विरोधात बसलेल्या रोहित पवारांनी “भाजपने राष्ट्रवादीचे अर्थखाते चोरले!” अशी बोंब ठोकली. त्यावर सुनेत्रा पवारांनी “काही लोकांना अफवा पसरवायची सवयच असते,” म्हणत पांघरूण घालायचा प्रयत्न केला खरा, पण न चुकता दररोज सकाळी येऊन राजकीय वात पेटवणारे संजय राऊत गप्प बसतील तर शप्पथ! राऊतांनी लगेच चिमटा काढला, “अजितदादांचा एक रुबाब होता, आता तुम्हाला याचकासारखे दारात उभे राहावे लागतेय, स्वाभिमान ठेवा जरा!” यावर राम कुलकर्णींनी रोहित पवारांना दिलेला सल्ला तर ऑस्कर लेव्हलचा होता— “रोहितदादांना अजितदादांच्या पक्षाची इतकीच काळजी असेल, तर त्यांनी स्वतःचा पक्ष सोडून सुनेत्रा वहिनींच्या पक्षात यावे!” आहे की नाही भन्नाट ऑफर? महाविकास आघाडीतील ‘फुसके बार’ आणि चंद्रपूरची सर्कस! सत्ताधाऱ्यांच्या घरात धूर निघत असताना विरोधकांच्या तंबूत तरी कुठे शांतता होती! लोकसभेला गोड गोड बोलणारे ‘मविआ’चे नेते विधानसभेच्या पराभवानंतर एकमेकांकडेच संशयाने पाहू लागले. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने डायरेक्ट ‘स्वबळा’चा नारा देत आपापली वेगळी चूल मांडली. उद्धव ठाकरेंनी ‘सामना’च्या मुलाखतीतून मित्रपक्षांनाच चिमटे काढले आणि वर “प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे” म्हणत थेट राज ठाकरेंच्या मनसेशीच घरोबा केला! ठाकरे बंधू एकत्र आल्याने काँग्रेसच्या पोटात गोळा आला नसता तरच नवल. या सगळ्याचा कळस झाला तो चंद्रपूर महानगरपालिकेत! ज्या भाजपला पाण्यात पाहण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला, त्याच भाजपला चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आणि काँग्रेसच्या तोंडचा सत्तेचा एकमेव घास हिरावून घेतला. बिच्चाऱ्या काँग्रेसला ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही! राऊतांची ‘नाराजीची लड’ आणि बांगरांचा ‘बॉम्ब’! इकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे नावही घ्यायचे टाळले असताना, ‘मविआ’चे भीष्माचार्य शरद पवारांनी मात्र शिंदेंचा जाहीर सत्कार करून टाकला! आता पवारांची ही गुगली ठाकरेंच्या पचनी कशी पडणार? संजय राऊतांनी लगेच आपल्या नेहमीच्या स्टाईलने पवारांवरच नाराजीची लड लावली. यापेक्षा मोठी लड लावायला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच तत्पर असतात; त्यांनी तर “पवार आणि शिंदे एकत्र येणार!” असे सूचक विधान करून राजकीय वर्तुळात धुराचे लोट सोडून दिले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे गरगरणारे ‘भुईचक्र’ भुईचक्र कसे स्वतःभोवतीच गोल गोल फिरते आणि शेवटी जागेवरच शांत होते? अगदी तसाच प्रकार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा झाला! 2024च्या निकालानंतर काका-पुतण्या एकाच मंचावर दिसले, जयंत पाटलांसोबत बंद दाराआड बैठकांच्या चर्चा झाल्या आणि विलीनीकरणाचे भुईचक्र जोरजोरात फिरू लागले. पण एकत्र आल्यावर बॉस कोण होणार? आणि बसायचे कुठे—सत्तेच्या मऊ खुर्चीवर की विरोधी बाकांवर? या प्रश्नांनी हे गणित असे काही गुंतवले की विचारता सोय नाही. जानेवारी 2026च्या अजितदादांच्या निधनानंतर एकनाथ खडसेंनी “विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती,” असा गौप्यस्फोट केला. पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली, तर तटकरे, पटेल आणि भुजबळ या ‘अनुभवी’ त्रिकुटाने सत्तेची ऊब सोडून विरोधात जाण्यास साफ नकार दिला. अखेरीस सप्टेंबर 2026 मध्ये स्वतः शरद पवारांनीच “आता विलीनीकरण शक्य नाही” म्हणून या वर्षभर फिरणाऱ्या भुईचक्रावर पाणी ओतले! जरांगेंचा सर्वात मोठा 500 कोटींचा ‘सुतळी बॉम्ब’ अन् विधान परिषदेचे ‘रॉकेट’ राजकारणात थोडी शांतता पसरतेय असे वाटत असतानाच, मनोज जरांगे पाटलांनी थेट 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा सुतळी बॉम्बच टाकला! खासदार श्रीकांत शिंदेंकडून जरांगेंना 500 कोटी दिल्याचा उल्लेख असलेल्या या क्लिपने अख्खा महाराष्ट्राच्या कानठळ्या बसल्या. शिंदेंनी आरोप फेटाळले खरे, पण महायुतीच्या मित्रपक्षांना एकमेकांवर तोंडसुख घ्यायला आयते कोलीत मिळाले. त्यातच विधान परिषदेच्या 5 जागांच्या निकालाने आणखी रॉकेट सोडण्याचे काम केले. सत्तेत 200 पेक्षा जास्त आमदार असूनही महायुतीला फक्त 2 जागा मिळाल्या आणि मविआने 3 जागांवर बाजी मारली! मग काय, भाजपच्या प्रवक्त्यांनी “शिवसेनेने गद्दारी केली” असा सूर लावला, तर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप प्रवक्त्यांची थेट ‘लायकी’च काढली! युतीधर्मातील हा कलगीतुरा चांगलाच रंगात आला होता. संजय गायकवाडांचे ‘पॉप-पॉप’ फटाके! दगडावर आपटून आवाज करणारे ‘पॉप-पॉप’ फटाके फोडले जातात, तसे फटाके फोडण्याचे कंत्राट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीच घेतले होते की काय, असा प्रश्न पडावा! एप्रिल 2026 मध्ये ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून त्यांनी प्रकाशकाची थेट जीभ कापण्याची धमकी दिली. कधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य, तर कधी स्वतःच्याच महायुतीतील भाजपच्या महिला आमदारांवर टीका! गायकवाडांचा फटाका वाजायचा, दोन दिवस टीव्हीवर धूर दिसायचा आणि तिसऱ्या दिवशी सगळे विसरूनही जायचे! थोडक्यात काय तर… सामान्यांच्या दिवाळीचे फटाके चार दिवसांत संपतात आणि कचरा साफ केला जातो. पण महाराष्ट्राच्या राजकारणातील हे फटाके वर्षभर वाजतच राहिले. पालकमंत्रिपदाची खुर्ची असो, अर्थखात्याची तिजोरी असो, की चंद्रपूरची सत्ता असो; या नेत्यांनी जनतेचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आता पुढच्या वर्षात ही राजकीय मंडळी कोणते नवीन बॉम्ब शोधून काढतात, याचीच महाराष्ट्राला उत्सुकता आहे!
Source link
महाराष्ट्राची राजकीय आतषबाजी:पालकमंत्रिपदाचा 'लवंगी फटाका' ते विलीनीकरणाचे 'भुईचक्र', अर्थखात्याच्या चर्चेची 'सुरसुरी' अन् 500 कोटींच्या क्लिपचा 'सुतळी बॉम्ब'