Headlines

नाशिक-ओझरखेड मार्गाची एक मार्गिका दुकानांमुळे बंदच, मार्गिका खुली करण्यावरून ग्रामपंचायत-पोलिसांत ढकलाढकली




त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक-ओझरखेड मुख्य रस्त्यावरील बिरसा मुंडा चौकातील बाजारपेठेत रस्त्याचे नव्याने दुपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र, एका मार्गिकेवर दुकाने थाटण्यात आली असून दुसऱ्या मार्गिकेवर दुचाकी व चारचाकी वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारी एक मार्गिका अद्याप वाहतुकीसाठी खुली झालेली नाही. ही मार्गिका मोकळी करण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. मात्र, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाऐवजी जबाबदारीची ढकलाढकली सुरू असल्याने दिवाळीच्या काळातही वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. रस्त्याची बंद मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. मात्र, त्यावर योग्य नियोजन करण्याऐवजी ग्रामपंचायतीने हरसूल पोलिसांनी कारवाई करावी, असे पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, रस्त्यावर दुकाने थाटलेल्या अनेक दुकानदारांकडे ग्रामपंचायतीची अधिकृत बाजारकर पावती असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे वाहनधारकांवर कारवाई होत असली तरी रस्त्यावरील दुकानांचा प्रश्न कायम आहे. दुसरी मार्गिका मोकळी करण्यासाठी हरसूल पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सातत्याने वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. मात्र, रस्त्यावरील दुकानांचे नियोजन आणि मार्गिका खुली करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने पार पाडणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीने यासाठी ठोस नियोजन न केल्याने रस्त्याची एक मार्गिका बंदच आहे. याचा फटका या मार्गावरील सर्वच दुकानदारांना बसत असून, दिवाळीच्या काळातही मार्गिका खुली न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ग्रामपंचायतीने बाजार कर पावती देऊन रस्त्याच्या कडेला दुकानांना मूक संमती दिली आहे. नव्याने झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन न केल्याने एक मार्गिका वाहनधारकांसाठी सुरू झालेली नाही. याचा फटका या सर्वच दुकानदारांना बसत आहे. – दिलीप चौधरी, दुकानदार दुसरी मार्गिका मोकळी करण्यासाठी पोलिस वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. परंतु दुकानांबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा . – जीवन बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिवाळीच्या काळातही बंद असलेली मार्गिका खुली करण्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने सांघिक प्रयत्न केलेले नाहीत. मार्गिका खुली करण्यासाठी समन्वयाने नियोजन करण्याऐवजी ग्रामपंचायत जबाबदारी पोलिसांवर ढकलत असल्याने व्यापारी नाराज आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *