Headlines

शेतकऱ्यांना मोठा दिलासा!:फळबागांसाठी बोअरवेल खोलीकरणावरील बंदी 15 डिसेंबरपर्यंत उठवली, CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा




शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी बोअरवेलच्या खोलीकरणावरील बंदी 15 डिसेंबरपर्यंत सशर्त उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून, बोअरवेल फ्लशिंगलाही कायमस्वरूपी परवानगी दिली आहे. यासोबतच, काल रात्री आणि आज सरपंच तसेच शेतकऱ्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर त्यांच्याकडून आलेल्या शेती, रस्ते आणि गावांच्या विविध प्रश्नांसंबंधीच्या निवेदनांची गंभीर दखल घेत, त्यावर सकारात्मक आणि तातडीने कारवाई करून बळीराजाला जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या फळबागांना आपण वाचवलं नाही तर ही झाडं पुन्हा त्या लेव्हलला येण्याकरता दहा बारा वर्ष लागतात आणि म्हणून अशा भागांमध्ये जिथे काही काळापर्यंत ही बंदी उठवणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही ती उठवणार आहोत. ही सरसकट उठवली जाणार नाहीये. फक्त ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत त्याच ठिकाणी ही बंदी 15 डिसेंबरपर्यंत आम्ही उचलणार आहोत. त्याच्यावरही आमची करडी नजर असेल प्रशासनाची कारण आपल्याला भूगर्भातलं पाणी हे पुरवायचं आहे आणि मे महिन्यापर्यंत आपल्याला ते पुरवायचं आहे. त्यामुळे एक खास बाब म्हणून फळबागा वाचवण्याकरता हा निर्णय आपण घेतलेला आहे. नवीन बोअरवेलबद्दल हे राहणार आहे की फ्लशिंग? यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फ्लशिंग हे पर्मनंट अलाव्ड आहे. फ्लशिंग कधीही करता येतं फ्लशिंगवर बंदी नाहीच. केवळ खोलीकरणावर बंदी आहे तीही काही काळ आपण उचलतो. यासाठी परवानगी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या समस्या आणि निवेदनांवर कार्यवाहीचे आश्वासन खूप सारे निवेदनं तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. हे निवेदनं मार्गी कसे लागणार आहेत? काय काय समस्या प्रामुख्याने होत्या? यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की काल रात्री आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि आज तालुक्यातले सरपंच आपण बोलावले होते. त्या सगळ्या सरपंचांसोबत आपण चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, गावांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पाणंदचे प्रश्न, तलावांचे प्रश्न असे विविध प्रश्न आपल्यासमोर आले. त्यातले बरेचशे प्रश्न हे मार्गी लागण्यासारखे आहेत. काहींच्या योजना तर ऑलरेडी घोषित झालेल्या आहेत. काही ठिकाणी पालकमंत्री आणि आमदारांनी त्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे आता आलेली सगळी निवेदनं जी आहेत त्या निवेदनांवर आम्ही कारवाई करू. काही चांगल्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सूचनांची आपल्याला अंमलबजावणी कशी करता येईल हा देखील आपण प्रयत्न करू. पण आपण बघितलं असेल काल रात्री बघितलं असेल आणि आजही बघितलं असेल तर अतिशय पोटतिडकीने शेतकऱ्यांनी आणि सरपंचांनी आपले विषय मांडलेले आहेत. आम्ही सगळ्यांचे विषय ऐकून घेतलेत कुणालाही अडवलं नाही. सगळं शांतपणे ऐकून घेऊन सगळ्यांची निवेदनं घेऊन त्यात जास्तीत जास्त जो मार्ग काढता येईल जी मदत करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले. बळीराजाच्या घरी मुक्काम आणि दिवाळीचा भावनिक अनुभव शेतकऱ्याच्या घरी काल तुम्ही साधेपणाने जेवण केलं, खाली बसून, सारवलेल्या अंगणात, रात्र घालवली, दिवाळी साजरी केली. अनुभव कसा होता? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तुमच्या याचं कौतुक केलेलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पहिल्यांदा तर रामभाऊ बालपांडे आणि अरुणाताई बालपांडे यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचं खूप चांगलं आगतस्वागत त्या ठिकाणी केलं. अतिशय उत्तम जेवण आम्हाला त्या ठिकाणी दिलं. आज न्याहारी पण अगदी चांगली दिली. आणि संपूर्ण कुटुंबाशी एक अत्यंत चांगली जवळीक तयार झाली. त्या ठिकाणी त्यांची नात आहे नारायणी ती पण अतिशय गोड आहे तिच्यासोबतही आमची मैत्री झाली आहे. आणि कुटुंब, शेतकरी कुटुंब आहे, त्यांच्याहीकडे यावेळी दुष्काळाचा खूप मोठा परिणाम झालाय. झाडांवरही झालेला आहे, संत्र्यावर देखील परिणाम झालाय आणि कापूस सोयाबीनवर देखील परिणाम झालेला आहे. एक समाधानाची बाब मला त्या ठिकाणी दिसली की त्यांचे सगळे मिळून ते तीन खातेदार आहेत, त्या तिन्ही खातेदारांचं कर्ज जे आहे त्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळाला आणि त्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ झालेलं आहे. त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं. आणि एक लढण्याची जिद्द त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा जो परिवार आहे ज्यांच्यामध्ये मी गेलो होतो, हा संपूर्ण परिवार वारीला जाणारा परिवार आहे. ते जे अरुणाताईंचे बंधू आहेत ते स्वतः दिंडी घेऊन त्या ठिकाणी आषाढीला जातात. त्यामुळे अतिशय भाविक अशा प्रकारचा परिवार आहे. आणि निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की विठ्ठलाची अर्चना करणारे जे शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्याचा सामना करतात. त्यामुळे मला देखील त्यांच्याकडे राहून खूप उभारी पण मिळाली, आत्मविश्वास पण मिळाला. एक प्रकारे मला असं वाटतं की खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला पण मिळाल्या. आणि त्यांच्या घरी राहण्यात मला अतिशय आनंद आला, झोप छान लागली. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणार या परिसरामध्ये खार प्रकल्प असेल, खोरी प्रकल्प असेल अशे सिंचन प्रकल्प वर्षानुवर्षे, 1980 ला जाहीर झालेले प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात जो दुष्काळ आहे त्याचं बेसिक कारण हे रखडलेले सिंचन प्रकल्प आहेत का? यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, निश्चितपणे आहेत आणि आता आपण जवळपास आपल्याला कल्पना आहे की गेल्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 97 प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. उरलेल्या प्रकल्पांनाही आता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आहे. विशेषतः आता हे जे काही प्रकल्प आहेत की जे म्हणजे शेवटचं काम ज्यांचं बाकी आहे त्याच्याही करता 15000 कोटी रुपयांचे आपण आता कर्ज घेऊन तेही प्रकल्प पूर्ण करतो आहोत. त्यामुळे निश्चित विदर्भ असेल मराठवाडा असेल यातल्या या छोट्या छोट्या प्रकल्पांमुळे एक मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *