Headlines

सक्तीची वसुली केली तर गाठ माझ्याशी- एकनाथ शिंदे,:फायनान्स कंपन्यांना दिला कडक शब्दांत इशारा; जालन्यातून शेतकऱ्यांसोबत साधला संवाद




दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बँका, फायनान्स कंपन्या आणि सावकारांनी सक्तीची कर्जवसुली करू नये. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. गरज पडल्यास शिवसेनेच्या भाषेत उत्तर देऊ, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फायनान्स कंपन्यांना दिला. शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, रोजगार आणि दुष्काळी सवलतींसाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीत अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. मात्र, या काळात शिवसैनिकांनीही गरजूंपर्यंत मदत पोहोचवावी. योजनांची अंमलबजावणी करावी, गाव आणि तालुका पातळीवर मदत कक्ष, समन्वय समित्या स्थापन करण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले. त्यामुळे सरकारसोबतच शिवसेना पक्षही संकटात शेतकऱ्यांच्या सोबत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. जालना तालुक्यातील मौजपुरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीच्या काळातही शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले नाही. आता दुष्काळातही त्यांना आधार देणार आहोत. संकट मोठे असले तरी त्याला संधी मानून त्यावर मात करू. शेतकऱ्यांच्या घरावर शिवसेनेचे तोरण असेल, असे ते म्हणाले. दुष्काळी उपाययोजनांसाठी पिण्याचे पाणी, चारा, रोजगाराच्या प्रश्नांवर संबंधित विभागांची बैठक घेण्यात येईल. ५७४ प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांसह जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाने निष्काळजीपणा करू नये याप्रसंगी मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, खासदार संदिपान भुमरे, आमदार अर्जुन खोतकर, डॉ. हिकमत उढाण, अभिमन्यू खोतकर, दर्शना झोल आदींची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळवून दिली जाईल. प्रशासनाने कोणताही निष्काळजीपणा न करता थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. ज्या पात्र लाडक्या बहिणींना १५०० रुपये महिना मिळत नाहीत, त्यांना ते दिले जातील. ही योजना बंद होणार नाही. मात्र, आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार योग्य वेळी २१०० रुपये दिले जातील. हा आम्ही दिलेला शब्द आहे. तो पाळणारच. महिलांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *