Headlines

‘आमदार रोहित पवार म्हणजे बँडवाले’:कुठेही आंदोलन असले की वाजवायला येऊ का विचारतात, राम शिंदेंची जोरदार टीका




आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्यभर राजकीय दौरे आणि आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला. ‘आमदार रोहित पवार म्हणजे बँडवाले आहेत. कुठेही आंदोलन असले की, मी वाजवायला येऊ का, असे ते विचारतात,’ अशा बोचऱ्या शब्दांत शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष छाया सुनील शेलार यांच्या पुढाकारातून दीपावलीनिमित्त आयोजित सन्मान सोहळा आणि फराळ कार्यक्रमात राम शिंदे बोलत होते. या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक, जामखेड नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी राजकीय घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘मतदारसंघातील प्रश्न सोडून राज्यभर फिरण्याची गरज काय?’ रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना राम शिंदे यांनी त्यांच्या राज्यभरातील आंदोलनांमधील सहभागाचा समाचार घेतला. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या विषयात रोहित पवार यांचा काय संबंध, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक ठिकाणच्या राजकीय विषयात हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यायला हवे, असेही त्यांनी सूचित केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत शिंदे म्हणाले की, २०१९ पासून काही काळ मतदारसंघात पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र, आता दुष्काळी परिस्थितीत हे टँकर कुठे गायब झाले आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसेच पूर्वी आयोजित होणारा दहीहंडीचा कार्यक्रम आता का बंद झाला, नागरिकांना चष्मे वाटप करण्याचा उपक्रम कुठे गेला, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. चष्मे वाटपाचा उपक्रम बंद झाला असेल तर नागरिकांची दृष्टी आता पूर्णपणे चांगली झाली आहे का, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरूनही विरोधकांना घेरले जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा संदर्भ देत राम शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार नसतानाही एका नेत्याने विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला जात होता, त्यालाच हा पाठिंबा नको असल्याचे चित्र होते, असा दावा त्यांनी केला. रोहित पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. नगरपंचायतीतील सत्तांतराचा उल्लेख; ‘माझ्यावर टीका करताना जनाची तरी ठेवा’ यावेळी राम शिंदे यांनी नगरपंचायतीतील सत्तांतराचा मुद्दाही उपस्थित केला. राज्याच्या मंत्रिमंडळाची प्रतिष्ठा पणाला लावून कायद्यात बदल करण्यात आला आणि त्यातून नगरपंचायतीत सत्तांतर घडवून आणण्यात आले, असे ते म्हणाले. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठी किंमत मोजावी लागल्याचा दावाही त्यांनी केला. माझ्यावर टीका करताना किमान जनाची तरी ठेवली पाहिजे. केलेल्या उपकारांची परतफेड अपकाराने करणे हे संस्कार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद मिळवून देण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्याला उच्च न्यायालयात आरोपी म्हणून उभे राहावे लागले. नगराध्यक्ष केल्याची एवढी किंमत मोजावी लागली, असा उल्लेखही शिंदे यांनी केला. त्यांच्या या विधानातून स्थानिक राजकारणातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे संचालक ज्योती प्रकाश शेळके आणि सचिन घुमरे, जामखेडच्या नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, अशोक खेडकर, काकासाहेब तापकीर, शरद कारले, सुनील शेलार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अशोक खेडकर, काकासाहेब तापकीर, प्रांजल चिंतामणी, नगराध्यक्ष छाया शेलार, सचिन घुमरे आणि भाऊसाहेब रानमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील शेलार यांनी आभार मानले, तर गजेंद्र यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हेही वाचा…. अजितदादा जिवंत असेपर्यंत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती:निधनानंतर विषय संपला, सुप्रिया सुळेंनी भूमिका केली स्पष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असून, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि विधानांमुळे एकत्रीकरणाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत या संपूर्ण विषयावर आपली भूमिका मांडली आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *