![]()
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात तीन जणांचा बळी घेणाऱ्या ‘जी-२५ एसएएफ’ वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजता कासन्सूर वनपरिक्षेत्रातील वडसकला बीटमध्ये ही कारवाई झाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने वाघिणीला बेशुद्ध करून ताब्यात घेतले. तीन वर्षांच्या या वाघिणीच्या हल्ल्यांत ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान तिघांचा मृत्यू झाला. १७ ऑगस्टला डोलंदा येथील ५७ वर्षीय हरी वड्डे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १९ ऑक्टोबरला इरपनपायली येथील ७० वर्षीय बिलाशी आनंद बा यांच्यावर हल्ला झाला. २ नोव्हेंबरला दिंडवी येथील ६८ वर्षीय सदाशिव दुग्गा यांचा बैल चारत असताना हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनांनंतर जारावंडी परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. तिसऱ्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. कासन्सूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनराज नगराळे यांनी १५ दिवसांत वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम तीव्र केली. जारावंडी राऊंडमधील वडसकला बीट, कक्ष क्रमांक एक येथे वाघिणीला पकडण्यात आले. मोहिमेचे नेतृत्व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केले. शूटर अजय मराठे यांच्यासह योगेश लकाडे, दीपेश तेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल्ल वटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
Source link
तीन जणांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद:गडचिरोलीत ताडोबाच्या रॅपिड रेस्क्यू टीमची पहाटे कारवाई