![]()
ऑनलाइन माध्यमातून अवघ्या २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करण्याच्या नादात मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेची १ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. देवनार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील जाहिरात, व्हॉट्सॲप क्रमांक आणि बनावट डिलिव्हरी एजंटच्या माध्यमातून ही सायबर फसवणूक करण्यात आली. येथील एका वसतिगृहात राहणाऱ्या परिचारिकेने सोशल मीडियावर २९९ रुपयांत ड्रेसची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर तिने एक ड्रेस खरेदी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला समोरील व्यक्तीने ड्रेसचे पैसे मागितले. मात्र, त्यानंतर शिपिंग चार्जेस, जीपीएस चार्जेस, ट्रॅकिंग फी, व्हेरिफिकेशन कोड आणि पत्ता निश्चित करणे अशा विविध कारणांखाली वारंवार पैशांची मागणी केली. परिचारिकेने १६ ते २० एप्रिल या ५ दिवसांच्या कालावधीत एकूण १ लाख रुपये भरले. भरलेली बहुतांश रक्कम परत केली जाईल आणि ऑर्डर घरपोच मिळेल, असे आश्वासन तिला वारंवार दिले जात होते. मात्र, पैसे भरूनही ड्रेस न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने सायबर क्राइम हेल्पलाइन “१९३०’ वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कुठल्याही वेबसाइटची विश्वासार्हता तपासा. युआरएल चेक करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वेबसाइटच्या स्पेलिंगकडे नीट लक्ष द्या. तिथे अशी बनावट नाव असू शकतात. तसेच सोशल मीडियावरील कुठल्याही जाहिरातील बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Source link
299 रुपयांचा ऑनलाइन ड्रेस पडला 1 लाखाला, मुंबईमध्ये नर्सला गंडा:सोशल मीडियावरील जाहिरात पाहून महिलेने केला होता ड्रेस बुक