Headlines

बीडमध्ये भरदिवसा थरार!:घरात घुसून महिलेचे अपहरण, मुलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत चारचाकीतून पळवले




बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरातून भरदिवसा एका 35 वर्षीय महिलेचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या चार अज्ञातांनी थेट महिलेच्या घरात घुसून महिलेसह तिच्या दोन लहान मुलांना मारहाण केली आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेला बळजबरीने गाडीत डांबून पळवून नेले. भरदिवसा घडलेल्या या अपहरण नाट्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. त्यातच काल दुपारी घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींनी घरात घुसून महिलेच्या मुलीला आणि लहान मुलालाही बेदम मारहाण केली. दिवसाढवळ्या थेट घरात घुसून महिलेचे अपहरण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने, कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांची तत्परता आणि महिलेची सुटका घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तातडीने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातून पोलिसांनी या महिलेची आरोपींच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. अपहरणकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या या महिलेवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल, अपहरणाचे कारण अस्पष्ट याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पसार झालेल्या इतर आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या महिलेचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच यामागचे सत्य उघडकीस येण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *