Headlines

सायली घाडगेने साखळी चोरांना पकडण्यात मदत केली:मुरलीधर मोहोळ म्हणाले, तिचा आदर्श घ्या; क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे सत्कार, शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज




पुण्यात साखळी हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना सायली घाडगेने प्रतिकार केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सायलीचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे सायलीचा सत्कार करण्यात आला. या वेळी तिचे वडील प्रमोद घाडगे, फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका आणि फाउंडेशनच्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर तसेच भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर उपस्थित होते. रविवारी रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास सायली ब्ल्यू नाईल हॉटेल ते कौन्सिल हॉल या रस्त्यावरून पायी जात होती. दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. सायलीने चोरट्याचा हात पकडून आरडाओरडा केला. त्याने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्याला लाथ मारली. दुचाकीवरील अन्य दोघांनीही तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सायली मदतीसाठी ओरडत राहिली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांनी तिघांना पकडले. मोहोळ म्हणाले की, सायलीसारख्या तरुणी धैर्याने चोरट्यांचा प्रतिकार करतात, ही कौतुकाची बाब आहे. तिचे धाडस स्त्रीशक्तीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले. सायली वास्तुविशारद आहे. तिच्या धाडसाचा सन्मान करताना आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. मुलींना शालेय स्तरापासून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यासाठी मंजुश्री खर्डेकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सत्कारावेळी सायलीला शाल, दुर्गामातेची प्रतिमा आणि शक्तीचे प्रतीक असलेली हनुमानाची प्रतिमा देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *