Headlines

दुष्काळातही शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्यांची दादागिरी:महिला रिकव्हरी एजंटच्या अर्वाच्च भाषेवर रोहित पवार, विजय वडेट्टीवार संतप्त




राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि कष्टकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, अशा सूचना शासनाकडून दिल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात काही फायनान्स कंपन्यांचे रिकव्हरी एजंट या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जाच्या थकबाकीसाठी शेतकरी आणि कष्टकऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, धमकावणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. अशाच एका प्रकरणातील महिला रिकव्हरी एजंटची ऑडिओ क्लिप समोर आली असून, यामध्ये कर्जदाराशी बोलताना वापरण्यात आलेल्या भाषेवरून राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या 22 हजार रुपयांच्या कर्जवसुलीसाठी शेतकरी-कष्टकऱ्यांना अशा प्रकारे अपमानित करण्याची हिंमत या एजंटना होतेच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जवसुलीच्या नावाखाली रिकव्हरी एजंटकडून कर्जदारांच्या घरातील महिलांबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य माणसांवर मानसिक दबाव वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी सरकारने केवळ तोंडी सूचना देऊन चालणार नाही, तर लेखी आदेश काढून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी अधोरेखित केले. संबंधित महिला रिकव्हरी एजंटविरोधात सरकार नेमकी काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार केवळ इशारे देत असेल, तर या कंपन्यांना नेमका कोणाचा धाक आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवारांनीही सरकारला धरले धारेवर दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले आहे. एका बाजूला दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीने वसुली करू नये, अशा सूचना दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला फायनान्स कंपन्यांचे रिकव्हरी एजंट शेतकरी आणि कष्टकऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. केवळ 22 हजार रुपयांच्या थकबाकीसाठी शेतकरी-कष्टकऱ्यांना अपमानास्पद भाषेत बोलण्याचे धाडस होतेच कसे? सरकारचा या कंपन्यांवर वचक राहिला आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. कर्जदार आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला गुलामासारखी वागणूक देता येणार नाही. कर्जवसुलीच्या नावाखाली दादागिरी आणि मानसिक त्रास सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारच्या आदेशांना केराची टोपली? कारवाईची मागणी दुष्काळ, शेतीतील नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आधीच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कर्जफेडीसाठी होणारा दबाव आणि रिकव्हरी एजंटकडून केली जाणारी कथित शिवीगाळ यामुळे कर्जदारांच्या अडचणी आणखी वाढत आहेत. शासनाने कर्जवसुलीबाबत दिलेल्या सूचनांचा प्रत्यक्षात कितपत परिणाम होत आहे, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा उपस्थित झाला आहे. खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ठोस नियमांची अंमलबजावणी करावी, संबंधित कंपनीची चौकशी करावी आणि ऑडिओ क्लिपमधील आरोपांची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या प्रकरणाची कितपत दखल घेते आणि संबंधित फायनान्स कंपनी व महिला रिकव्हरी एजंटविरोधात काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *