![]()
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अपमान झाल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेपासून ते थेट नाशिकपर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे मुंबईत विरोधकांनी थेट महापौरांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारला, तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई महापालिकेत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महापौरांना धारेवर धरले. बाळासाहेबांचा अपमान झालेला असताना सभागृहाचे कामकाज सुरू का ठेवले, असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी महापौरांच्या कॅबिनमध्ये जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कॅबिनमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या, तर महापौरांना समर्थन देण्यासाठी भाजपचे नगरसेवकही तिथे दाखल झाले. परिणामी भाजप नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक आमनेसामने आल्याने दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी व आरोप-प्रत्यारोप होऊन कॅबिनमध्ये जोरदार गोंधळ निर्माण झाला. मुंबईतील या राड्यानंतर नाशिकमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, एकनाथ शिंदे यांचा फोटो फाडण्याचा इशाराही दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे नाशिकमधील राजकीय संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शायना एनसींना एकनाथ शिंदेंनी बोलावून घेतले दुसरीकडे, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या शायना एनसी या विधानभवनात दाखल झाल्या आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या घटनेबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर शायना एनसी नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापौर रितू तावडे काय म्हणाल्या? एकूणच, महापालिकेतील गोंधळ, मनसेची घोषणाबाजी आणि विधानभवनातील घडामोडींमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. सभा तहकूब करा, अशी पेडणेकरांनी मागणी केली होती. पण सभागृह तहकूब होणार नाही, असे आम्ही विरोधकांना सांगितले. सभागृह तहकूब न केल्याने विरोधकांकडून वॉकआऊट करण्यात आले, असे रितू तावडे म्हणाल्या आहेत.
Source link
बाळासाहेबांच्या फोटोच्या अपमानावरून राजकारण पेटले:विरोधकांकडून मुंबई महापालिकेच्या सभागृहातून वॉकआऊट