![]()
समाजात वाचकांची संख्या कमी झालेली नाही, तर मोठ्या प्रमाणात वाचक उपलब्ध आहेत. मात्र, वाचकांना नेमके काय वाचायला आवडते, त्यांची अपेक्षा काय आहे, हे लेखकाला समजणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार लेखन करताना पुरेसा वेळ देणे, चिंतन करणे आणि विषयाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. लेखनाची शैली सहज, सोपी आणि सर्वसामान्यांना समजेल अशी असेल, तर ते वाचकांच्या पसंतीस अधिक उतरते, असे मत प्रसिद्ध लेखक अक्षत गुप्ता यांनी व्यक्त केले. गुप्ता यांचे ‘द अदर इंडियन’ हे पुस्तक डिसेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाच्या कथानकाविषयी माहिती देताना ते म्हणाले, एका व्यक्तीचा विमान अपघात होऊन तो पाकिस्तानमध्ये पडतो. त्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांकडून त्याला पकडून त्याची चौकशी केली जाते. या चौकशीदरम्यान भारताचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी संबंधित व्यक्ती हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून भारतीय इतिहासाची मांडणी करते. यातून इतिहासाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या विचारधारांमधील दृष्टिकोन समोर येतात. प्राचीन भारतातील प्रमुख पात्रांचा आधुनिक विज्ञानाशी संबंध जोडून लिहिलेले तीन भागांचे ‘द हिडन हिंदू’ हे पुस्तक सहा वर्षांच्या प्रयत्नांनंतर २०२१ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकावर आधारित चित्रपटाची निर्मिती माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी करणार असून, त्यासाठी पुस्तकाचे दृश्य माध्यमांतील हक्कही घेण्यात आले आहेत, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. तसेच, अहमदशाह अब्दालीविरोधात १११ नागा साधूंनी दिलेल्या लढ्यावर आधारित दोन भागांतील ‘द नागा वॉरियर’ या पुस्तकावरही चित्रपटाची निर्मिती होत आहे. हिंदू धर्मातील विविध परंपरा आणि रीतिरिवाजांमागील शास्त्रीय कारणांचा शोध घेणारे ‘द लॉजिकल हिंदू’ हे त्यांचे आणखी एक पुस्तक फेब्रुवारीमध्ये प्रकाशित होणार आहे. यात अशा ५१ मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. नवोदित लेखकांना सल्ला देताना गुप्ता म्हणाले, लेखन करताना घाई करू नये. केवळ पुस्तक प्रकाशित करण्याच्या उद्देशाने लिखाण करण्यापेक्षा विषयाचा अभ्यास करून दर्जेदार साहित्यनिर्मितीवर भर द्यावा. लेखक म्हणून आपल्याला नेमके कुठे पोहोचायचे आहे, हे आधी निश्चित करून त्यानुसार लेखनाला प्राधान्य दिले पाहिजे.
Source link
‘द हिडन हिंदू’वर चित्रपटाची निर्मिती होणार:महेंद्रसिंग धोनी घेणार निर्मितीची जबाबदारी; लेखक अक्षत गुप्ता यांच्या आगामी पुस्तकांचीही घोषणा