स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुस्तकातून अपमान करण्यात आल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. सावरकरांना वारंवार ‘माफीवीर’ संबोधून त्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोप शिंदे य
.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकात सावरकरांचा अपमान करणारी दोन पाने असल्याचा दावा शिंदे यांनी केला. या पुस्तकातील सावरकरांविषयीच्या अपमानजनक मजकुराचा निषेध म्हणून शिवसेनेने ती पाने फाडून निषेध व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी यापूर्वीही सावरकरांना वारंवार ‘माफीवीर’ संबोधून त्यांचा अपमान केला आहे. जाणीवपूर्वक सावरकरांची बदनामी करण्याचे काम काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
सावरकरांनी देशासाठी केलेले कार्य आणि त्यांनी भोगलेल्या यातना सर्वश्रुत आहेत. अशा स्वातंत्र्यसैनिकाचा वारंवार अपमान करणे ही बौद्धिक दिवाळखोरी असून, ही कुठली मर्दुमकी आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जनतेने तीन वेळा नाकारले असून, निवडणुकीत त्यांना घरी बसवले आहे, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप
सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत राहणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत असून, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवसेना पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सूत्र पक्षाने कायम ठेवले आहे. जनतेनेही या विचारधारेला स्वीकारून शिवसेनेला आशीर्वाद दिले आहेत, असे शिंदे म्हणाले.
शायना एनसी यांच्या संदर्भातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून होत असलेल्या आरोपांनाही शिंदे यांनी उत्तर दिले. संबंधित फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना चप्पल मारल्याचा असल्याचे शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फोटोमध्ये फाटलेला भाग हा मणिशंकर अय्यर यांच्या चेहऱ्याचा असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांचा अपमान शिवसैनिक कधीही सहन करणार नाही, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेसकडून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला श्रद्धांजली न दिल्याचा सवाल
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी एकही ट्विट किंवा श्रद्धांजली व्यक्त केली नाही, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला. इंडिया आघाडीत एकत्र असताना आणि सत्तेत सहभागी असताना बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला श्रद्धांजली न देणे, मात्र त्यांच्यासोबत राजकीय संबंध ठेवणे, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची निंदा आणि निषेध केला पाहिजे. यापुढेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात शिवसेना आंदोलन करेल आणि त्यांना विरोध करेल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करणे, दुष्काळग्रस्त भागात जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा…
सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी