राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या कल्याणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, वसतिगृहांचे बांधकाम आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 6,840 कोटी रुप
.
ओबीसी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी उपसमिती सातत्याने प्रयत्न करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून (NSP) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणासाठी सुमारे 1,800 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ 83 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याने शिष्यवृत्तीचा निधी तातडीने वाढवण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच महाज्योती संस्थेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे, पुण्यातील प्रस्तावित संकुलासाठी जागा देणे आणि विविध योजनांचा अनुशेष भरून काढण्याबाबतही चर्चा झाली.
व्हिजेएनटी समाजासाठी राज्यभर 500 विशेष शिबिरे
विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि भटक्या समाजातील 43 जातींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. येत्या 6, 7 आणि 8 जानेवारी 2027 रोजी राज्यभर सुमारे 500 विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून संबंधित समाजघटकांना 100 टक्के जन्मदाखले आणि आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक सर्कलला 10 हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. याशिवाय ओबीसी समाजासाठी विविध योजनांमधून बांधण्यात आलेल्या घरकुलांवर लाभार्थ्यांच्या नावाचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात 100 क्षमतेची वसतिगृहे
ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेची, तर विभागीय जिल्ह्यांमध्ये 250 विद्यार्थी क्षमतेची मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. एमएसआयडीसीने तयार केलेल्या आराखड्यानुसार मार्च 2027 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
ही वसतिगृहे पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच सौरऊर्जेचा वापर करून बांधण्याच्या सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. 30 डिसेंबरपर्यंत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी आणि मार्चच्या अर्थसंकल्पात 10 नवीन वसतिगृहांसाठी निधीची तरतूद करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोरेगाव येथील दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या न्यूझीलंड वसतिगृहातील 80 खोल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाला उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ए-कॅपची (A-CAP) नस्ती अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. तसेच लक्ष्मण हाके यांच्या मागण्याही पूर्ण केल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच 9 टक्के आरक्षणाचा नव्याने अभ्यास करून त्यासंदर्भातील प्रस्ताव सांख्यिकी विभागाकडे सादर करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
महायुतीतील नेत्यांवरील टीका खपवून घेणार नाही
ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर बावनकुळे यांनी महायुतीतील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत तिन्ही घटक पक्षांनी एकमताने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही घटक पक्षाच्या आमदार, खासदार किंवा पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांवर जाहीरपणे टीका करू नये, असे ठरवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर विरोधकांकडून अथवा सोशल मीडियावर खालच्या पातळीवर टीका झाल्यास तिन्ही पक्ष एकत्रितपणे मैदानात उतरतील आणि त्याला सडेतोड प्रत्युत्तर देतील, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची माफी मागावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवरूनही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांचे विधान हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले असले, तरी शरद पवार यांनी दिलेले संस्कार रोहित पवार यांनी पाळावेत, असे ते म्हणाले.
विकासाच्या राजकारणात मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या टीकेबद्दल रोहित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.
शायना एनसी यांच्यावरील वक्तव्याचा निषेध
शायना एनसी यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेचे राजकारण करत खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेचा बावनकुळे यांनी तीव्र निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरली जाणे ही दुर्दैवी बाब आहे. अशा वक्तव्यांमुळे राज्याच्या संस्कृतीला कलंक लागत असल्याचे ते म्हणाले.
सातारा जिल्हा बँकेतील घडामोडींवर समन्वयाची भूमिका
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उदयसिंह पाटील यांना संधी दिली. याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी महायुतीतील समन्वयाची भूमिका स्पष्ट केली.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपासून स्थानिक नेत्यांमध्ये काही मतभेद निर्माण झाले आहेत. हे मतभेद दूर करण्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून चर्चा करतील. जिल्ह्यातील राजकीय एकोपा कायम राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपासून वसतिगृहांच्या उभारणीपर्यंत आणि व्हिजेएनटी समाजाच्या कागदपत्रांच्या प्रश्नांपर्यंत विविध मुद्द्यांवर या बैठकीत निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आगामी काळात या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे ओबीसी आणि भटक्या-विमुक्त समाजाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
सोनिया गांधींच्या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा दावा: शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतच फाडल्या सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती; उद्धव ठाकरेंवरही शरसंधान

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा अत्यंत अवमानजनक उल्लेख करण्यात आल्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय निरुपम, शायना एन. सी. आणि महिला नेत्यांनी थेट कॅमेऱ्यांसमोर या पुस्तकाची आक्षेपार्ह पाने टराटरा फाडून तीव्र निषेध नोंदवला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना हा अपमान मान्य आहे का?” असा सणसणीत सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी