![]()
पुण्याचे जुने नाव असलेल्या ‘पुनवडी’पासून आजच्या आधुनिक पुण्यापर्यंतचा प्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे कलाग्राममध्ये १० ते १७ जानेवारीदरम्यान ‘पुनवडी महोत्सव २०२६’ होणार आहे. साडेचार एकर परिसरात जुन्या पुण्याची प्रतिकृती उभारली जाईल. कला, साहित्य, परंपरा, खेळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश महोत्सवात असेल. सदैव फाउंडेशन आणि हनुमान मित्र मंडळ (कसबा पेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला आहे. ‘ऐतिहासिक वारसा, आधुनिकतेचा ध्यास’ हे महोत्सवाचे ब्रीदवाक्य आहे. सदैव फाउंडेशनचे विश्वस्त आणि प्रमुख संयोजक अनिरुद्ध येवले यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक स्वरूप देणे आणि पुण्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विविध संस्था, कंपन्या आणि मान्यवरांच्या सहभागातून महोत्सवाची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी हा लोकउत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचे येवले यांनी सांगितले. माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, पुण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक वैभव नव्या पिढीसमोर आणण्यासाठी जुन्या पुण्याची प्रतिकृती उभारली जाणार आहे. नागरिकांना पुण्याची जीवनशैली, कला, उत्सव आणि सामाजिक वातावरण अनुभवता येईल. महोत्सवात हास्ययोग, नाटक, ढोल-ताशा, तलवारबाजी, भालाफेक, कबड्डी आणि खो-खोचे सादरीकरण होणार आहे. सुमारे दहा हजार विद्यार्थी आणि ३०० हून अधिक कलाकार सहभागी होतील, अशी माहिती पराग ठाकूर यांनी दिली. मकरंद टिल्लू यांच्या पुढाकारातून हास्ययोगाचे सादरीकरणही होईल. डॉ. दीपक शिकारपूर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वतंत्र दालन उभारण्याची सूचना केली. तरुणांना अमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी चित्रपट, पोस्टर्स आणि रिल्सच्या माध्यमातून जनजागृती करणारे दालन उभारण्याची सूचना डॉ. मिलिंद भोई यांनी केली.
Source link
साडेचार एकरांत जुन्या पुण्याची प्रतिकृती उभारणार:10 ते 17 जानेवारीदरम्यान सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे कलाग्राममध्ये ‘पुनवडी महोत्सव 2026’