![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपांना भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपचे श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’ असे संबोधले आहे. तसेच, रोहित पवार यांना त्यांची पीआर टीम चालवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विक्रम पाचपुते यांनी रोहित पवार यांच्या आरोप करण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित पवार हे अनेकदा अर्धवट माहिती देऊन आरोप करतात. एखादा आरोप इतका गंभीर असेल, तर त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती आणि पुरावे जनतेसमोर मांडण्याची जबाबदारीही त्यांची आहे, असे पाचपुते यांनी म्हटले. केवळ काही माहिती समोर आणून संभ्रम निर्माण करण्यापेक्षा संपूर्ण तपशील स्पष्ट करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. रोहित पवारांना पीआर टीम चालवते; पाचपुतेंचा टोला रोहित पवार यांच्या ‘अर्धवटराव’ या उल्लेखावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटातील ‘झपाटलेला’ या सिनेमाचा संदर्भ देत पाचपुते यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘झपाटलेला’ चित्रपटात लक्ष्या अर्धवटरावला बोलका करतो. त्याचप्रमाणे रोहित पवार यांच्या बाबतीत त्यांची पीआर टीम ही भूमिका बजावते, असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार स्वतः राजकीय भूमिका मांडण्याऐवजी त्यांची पीआर टीम त्यांना कशा पद्धतीने सादर करते, यावरही त्यांनी टीका केली. रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबई आणि पुण्यात बॅनरबाजी करत या प्रकरणात मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्याबाबत गंभीर आरोप केले. या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न राज्यातील एका बड्या नेत्याकडून होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी संबंधित नेत्याचे नाव जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जयपूर येथे व्हीएसआर कंपनीशी संबंधित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असल्याचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि कंपनीच्या मालकाचा एकत्रित फोटोही दाखवला होता. विमान अपघातावरून आरोप-प्रत्यारोपांना धार अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास, व्हीएसआर कंपनीची भूमिका आणि या प्रकरणातील संभाव्य जबाबदारी यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. आता विक्रम पाचपुते यांनी केलेल्या टीकेमुळे या वादात आणखी भर पडली आहे. एकीकडे रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते त्यांच्या आरोपांच्या विश्वासार्हतेवर आणि माहितीच्या अपूर्णतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा आता केवळ तपासापुरता मर्यादित न राहता राज्यातील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनत असल्याचे चित्र आहे. हेही वाचा… राज्यातील आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित:शेतकऱ्यांना दिलासा, कर्जवसुलीला स्थगिती अन् वीजबिलात सवलत राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. आता त्यामध्ये आणखी 6 तालुक्यांची भर पडली आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील सहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. सविस्तर वाचा…..
Source link
रोहित पवार महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, पीआर टीमच त्यांना चालवते:अजित पवारांच्या विमान अपघातावरून फडणवीसांवर केलेल्या आरोपांना विक्रम पाचपुतेंचे प्रत्युत्तर