Headlines

पतीच्या विवाहबाह्य संबंधांना वैतागून पत्नीनेच दिली 13 लाखांची सुपारी:कारच्या जीपीएस ॲपवरून 'लाइव्ह लोकेशन' काढत पुण्यातील एअर हॉस्टेसचा जंगलात निर्घृण खून




गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी परिसरातील निर्जन जंगलात 5 दिवसांपूर्वी झालेल्या पुण्यातील एअर हॉस्टेस वर्षा धुरनलाल तुरकर (वय 35) यांच्या थरारक हत्याकांडाचा छडा लावण्यात गोंदिया पोलिसांना अखेर मोठे यश आले आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयामुळे वैतागलेल्या पत्नीनेच तब्बल 13 लाख रुपयांची सुपारी देऊन पतीच्या मैत्रिणीचा काटा काढल्याचा धक्कादायक उलगडा तपासात झाला आहे. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) 6 विशेष पथकांच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण आणि सुमारे 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत मुख्य सूत्रधार पत्नी मोना नितेश अग्रवाल (वय 41) हिच्यासह 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडातील अन्य 2 फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. कारच्या जीपीएस ट्रॅकिंग ॲपचा वापर करून साधला अचूक डाव या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्धरीत्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रचण्यात आला होता. पुण्यातील धानोरी येथे राहणाऱ्या आणि एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या वर्षा तुरकर व नितेश ऊर्फ नितीन अग्रवाल यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे व प्रेमसंबंधांच्या संशयामुळे नितेशची पत्नी मोना अग्रवाल प्रचंड त्रस्त होती. यातूनच तिने परिचयातील शेजारी कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय 31) याच्या मदतीने वर्षा यांना संपवण्याचा कट रचला. कुणालने सराईत गुन्हेगार शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय 33) याला 13 लाख रुपयांची सुपारी दिली, तर शाहरुखने संजयनगर, मुर्री येथील इमरान करीम शेख (वय 26), नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत यांच्यावर प्रत्यक्ष हत्येची जबाबदारी सोपवली. या सुपारीसाठी मोना हिला छत्तीसगडमधील एका व्यक्तीकडून 13 लाख रुपये मिळाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. जीपीएस आयडी-पासवर्ड दिला मारेकऱ्यांना ज्या कारमधून नितेश फिरत होता, ती कार पत्नी मोना हिच्याच नावावर होती. या कारमध्ये ‘टोयोटा आय-कनेक्ट’ ही जीपीएस ट्रॅकिंग सुविधा कार्यरत होती. मोनाने या ॲपचा लॉग-इन आयडी आणि पासवर्ड मारेकऱ्यांच्या मोबाइलमध्ये सक्रिय करून दिला होता. त्यामुळे आरोपी घरबसल्या नितेशच्या कारचे ‘लाइव्ह लोकेशन’ पाहत होते. 14 नोव्हेंबरच्या सायंकाळी जंगलात नेमके काय घडले? मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावच्या रहिवासी असलेल्या वर्षा तुरकर यांना भेटण्यासाठी 14 नोव्हेंबर 2026 रोजी नितेश अग्रवाल आपली चारचाकी घेऊन आला होता. दोघेही तिरोडा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना सायंकाळी 5.30 ते 6च्या सुमारास बोंडराणी परिसरातील शिवमंदिराजवळील निर्जन जंगलात त्यांनी गाडी थांबवली. जीपीएस लोकेशनवरून कार तिथे थांबल्याचे समजताच दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या 3 हल्लेखोरांनी गाडीजवळ पोहोचून वर्षा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. पोटात आणि पाठीवर गंभीर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वर्षा यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला नितेशने अज्ञात लुटारूंनी हा हल्ला केल्याचा बनाव रचला होता. परंतु, मृत वर्षा यांच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि इतर दागिने सुरक्षित असल्याने पोलिसांचा संशय बळावला. 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीतून आरोपींच्या मुसक्या आवळल्या या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गोंदिया पोलिसांनी 6 विशेष तपास पथके तयार केली. घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट आणि गोंदिया परिसरातील सुमारे 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये दुचाकीवरील 3 तरुण नितेशच्या कारचा पाठलाग करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) गोंदियातील मुर्री परिसरातून इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी इम्रान शेखसह शाहरुख खान पठाण, कुणाल कुंभलकर आणि मुख्य सूत्रधार पत्नी मोना नितेश अग्रवाल अशा एकूण 4 जणांना अटक केली असून, फरार असलेल्या नलेन शेख आणि क्रिश राऊत या 2 आरोपींचा शोध सुरू आहे. ————————————————————– हेही वाचा… विरोधी विचारांच्या खऱ्या मतदारांची नावं भाजपने वगळली: रोहित पवारांचा रडीचा डाव खेळून सत्ता मिळवल्याचा आरोप; ऑडिओ क्लिप पोस्ट करत पुरावा दिल्याचा दावा निवडणुकीतील विजयावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करत भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. निवडणुक जिंकण्यासाठी मारण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक विरोधी विचारांच्या मतदारांची नावे यादीतून वगळली, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *