Headlines

Rohit Pawar Tractor Morcha From Shegaon To Nagpur; Farmers Protest 2026


राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी थेट नागपूरपर्य

.

नागपुरात विदर्भातील पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी या आंदोलनाची माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, सरकारकडून केवळ मदतीच्या घोषणा केल्या जात असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी सरकारला भाग पाडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतीच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार

गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी सरकारने मदतीची घोषणा केली होती; मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी कर्जवसुली पुढील दोन वर्षांसाठी सरसकट थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, यासाठी केवळ राज्य सरकारचा आदेश पुरेसा नसून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) अधिकृत आदेश जारी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय शेतकरी आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र रोजगार हमी योजना सुरू करावी, मच्छीमारांनाही सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी, अशा मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिवेशनात प्राधान्य मिळाले पाहिजे. केवळ आश्वासने न देता सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाची परिस्थिती?

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना रोहित पवार यांनी सरकारच्या मदतीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 1972 चा दुष्काळ महाराष्ट्रातील सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो. मात्र, सध्याची परिस्थितीही त्यापेक्षा गंभीर असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या दाव्यानुसार, यंदा राज्यातील केवळ 17 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारही राज्याला पुरेशी मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारी कागदपत्रांमधील आकडे आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. या प्रश्नावर काँग्रेसचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पक्षातील आमदार-खासदार फुटणार नसल्याचा दावा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार आणि खासदार दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनाही रोहित पवार यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षातील एकही आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिले आहे. शरद पवार आणि या लोकप्रतिनिधींमधील नाते हे केवळ राजकीय नसून भावनिक आहे. त्यामुळे पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावर पुन्हा प्रश्न

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरूनही रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजितदादांचा अपघात संपूर्ण जगाने पाहिला असून, या घटनेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती नाराज आहे. या अपघातात सहभागी असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या विमानाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित कंपनीचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी संबंध असल्याचे दिसत असल्याने तपासाच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

अपघाताच्या तांत्रिक बाबींवर प्रश्न विचारले असताना त्यांची उत्तरे देण्याऐवजी व्हीएसआर कंपनी कशी चांगली आहे, यावर स्पष्टीकरण दिले जात असल्याची टीका त्यांनी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन तपास पारदर्शक पद्धतीने व्हायला हवा. तपासावर जनतेचा विश्वास बसला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, आपण व्हीएसआरच्या विमानाने प्रवास केल्याची बाब यापूर्वी अनेकदा स्पष्ट केली आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कंपनीला 168 कोटी रुपये दिले गेल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे या व्यवहाराबाबत आणि कंपनीबाबत आमच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे संबंधित नेत्यांनी द्यावीत, प्रवक्त्यांनी नव्हे, असेही त्यांनी सुनावले.

‘दादांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात आलो’

अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणावर बोलताना रोहित पवार भावनिक झाले. माझ्यावर कितीही टीका झाली तरी मी ती मनावर घेत नाही. माझे पुतळे जाळले असतील, तरी मी दादांना जळताना पाहिले आहे, असे ते म्हणाले. अजितदादांना न्याय मिळवून देणे हे आपल्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे सांगत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात आलो नसेल, तर राजकारणात येण्याचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला.

या प्रकरणात कर्नाटक सरकारने त्यांची झिरो एफआयआर नोंदवून घेतली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनीही सहकार्य केले. सर्वांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि दादांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

परिसीमन विधेयकावर मसुदा आल्यानंतर भूमिका

परिसीमन विधेयकाबाबत विचारले असता, या विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर त्याचे सविस्तर वाचन करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील नेते मसुद्याचा अभ्यास करतील. त्यानंतर विधेयकाबाबत पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच भाजपवर जातीय आणि धार्मिक मुद्द्यांवरून राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले. भाजपला जातिवाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यांवर राजकारण करणे जमते; मात्र आम्ही जनतेच्या प्रश्नांवर आणि लोकांच्या विचारांवर आधारित राजकारण करतो, अशी टीका त्यांनी केली.

एकीकडे पक्षातील संभाव्य फूट पडण्याच्या चर्चांना रोहित पवार यांनी उत्तर दिले, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शेगाव ते नागपूर ट्रॅक्टर मोर्चाकडे आणि हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा….

‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’:अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासावरून हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत, ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’ असा खोचक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना, अजित पवार विमान दुर्घटना आणि भाजपच्या राजकारणावरही भाष्य केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.