Headlines

पाटणमध्ये ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉइल, ऑइल चोरीला:संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प, शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात चोरट्यांचा धुमाकूळ




राज्याचे पर्यटनमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात चोरट्यांनी केलेल्या एका चोरीमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जॅकवेलच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉइल आणि ऑइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि पाटण शहराला रविवारी पाणी मिळू शकले नाही. सुमारे 50 ते 60 हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरट्यांनी केवळ साहित्याची चोरी केली नाही, तर शहराची पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प केल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पाटण हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून शहरातील नागरिकांना पाटण नगरपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी कोयना नदीच्या पात्रातून पाणी उचलून ते शहरात वितरित केले जाते. नदीपात्रातील जॅकवेलमधून पाणी उपसा करण्यासाठी स्वतंत्र 11 केव्ही वीज फीडरची व्यवस्था करण्यात आली आहे. या यंत्रणेतील ट्रान्सफॉर्मरमधून वीजपुरवठा केला जातो. मात्र, चोरट्यांनी याच ट्रान्सफॉर्मरला लक्ष्य केले. ट्रान्सफॉर्मरमधील मौल्यवान तांब्याची कॉइल आणि ऑइल चोरून नेल्याने पाणी उपसा करणारी यंत्रणा बंद पडली. चोरट्यांनी आधी वीजवाहक तारा तोडल्या, नंतर ट्रान्सफॉर्मर फोडला या चोरीमागे पूर्वनियोजन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी जॅकवेलच्या ट्रान्सफॉर्मरला जोडलेल्या 11 केव्हीच्या तीन वीजवाहक तारा आधी तोडल्या. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉइल आणि ऑइल काढून नेले. ही चोरी करताना चोरट्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यापासून ते साहित्य बाहेर काढण्यापर्यंत नियोजन केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीतून समोर आले आहे. ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल आणि ऑइलची किंमत लक्षात घेता चोरट्यांनी आर्थिक फायद्यासाठी पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सुविधेला लक्ष्य केल्याचे दिसून येते. रविवारी सकाळी प्रकार उघडकीस; नगरपंचायत आणि महावितरणची धावपळ रविवारी सकाळी जॅकवेलचा वीजपुरवठा बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोयना नदीतून पाणी उपसा करणे शक्य झाले नाही. परिणामी, पाटण शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नगरपंचायत प्रशासन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. शहरातील नागरिकांचे दैनंदिन पाण्याचे नियोजन कोलमडले. पिण्याचे पाणी, घरगुती वापर आणि इतर गरजांसाठी नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. एका ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरीला गेल्याने संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने या यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम युद्धपातळीवर घटनेनंतर पाटण नगरपंचायत आणि महावितरणने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चोरीला गेलेल्या ट्रान्सफॉर्मरऐवजी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वीजपुरवठा पूर्ववत करून जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू करणे, हे प्रशासनासमोरील तातडीचे आव्हान आहे. यासाठी दोन्ही यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहराचा पाणीपुरवठा नेमका किती वेळात सुरळीत होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नागरिकांची नाराजी या घटनेनंतर पाटण नगरपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणीपुरवठा बंद पडल्याने नागरिकांना निर्माण झालेल्या अडचणी आणि पर्यायी व्यवस्थेबाबत माहिती मिळणे अपेक्षित असताना मुख्याधिकारी सत्यम जगदाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन किंवा संदेशाला प्रतिसाद दिला नाही. मुख्याधिकारी नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत नसल्याचीही स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे केवळ चोरीच्या घटनेचा तपासच नव्हे, तर नागरिकांना वेळेत माहिती देणे आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी भूमिका घेण्याची मागणी होत आहे. चोरट्यांना लवकरच पकडणार; पोलिसांचा तपास सुरू या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पाटणचे पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी तक्रारीनुसार तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच लवकरच संशयितांना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पाटण हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने या घटनेकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. शहराच्या मूलभूत गरजेशी संबंधित असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेतील साहित्याची चोरी होऊन संपूर्ण शहराला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडून चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्याबरोबरच अशा महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधांच्या सुरक्षेसाठी प्रशासन काय उपाययोजना करणार, तसेच नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई काय भूमिका घेणार, याकडे पाटणकरांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’:अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासावरून हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत, ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’ असा खोचक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना, अजित पवार विमान दुर्घटना आणि भाजपच्या राजकारणावरही भाष्य केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *