आगामी 2029च्या निवडणुकांपूर्वी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सत्तेत मोठा वाटा मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे अत्यंत गरजेचे असून, प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मोठी ऑफर केंद्रीय सामाजिक न्
.
2029 पूर्वी रिपब्लिकन ऐक्याचे संकेत; प्रकाश आंबेडकर तयार होत नसल्याची खंत
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीर करताना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना साद घातली. 2029च्या निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष एकत्र येऊ शकतो. प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन आरपीआयचे अध्यक्षपद स्वीकारावे; माझ्या त्या निर्णयाला कोणतीही हरकत नसेल.
1990 च्या ऐतिहासिक चुकीची आठवण
1990 मध्ये बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर) माझ्यासोबत राहिले असते आणि काँग्रेस-आरपीआय आघाडी झाली असती, तर आंबेडकरी समाजाला सत्तेत मोठा सहभाग मिळाला असता. जोपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. मात्र, सध्या त्यांच्याशी थेट बोलणे होत नसून ते ऐक्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे, अशी खंतही आठवले यांनी व्यक्त केली.

शरद पवार 2019 मध्ये एनडीएमध्ये आले असते, तर 2022 मध्ये राष्ट्रपती झाले असते!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या आणि शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर आठवले यांनी सूचक वक्तव्य केले. अजितदादा पवार हयात असते, तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय होऊ शकला असता. मात्र, त्यांच्या अकाली जाण्यामुळे आता हे एकत्रीकरण शरद पवार एनडीएमध्ये येणार की नाही, यावरच अवलंबून आहे.
2022 च्या राष्ट्रपतीपदाची हुकलेली संधी
अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात जॉर्ज फर्नांडिस, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरद यादव आणि नवीन पटनायक हे नेते एनडीएमध्ये होते. विकासाची आणि शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या शरद पवारांनी 2019 मध्येच एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला असता, तर ते 2022 मध्ये देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते; पण त्यांनी ती संधी गमावली.
डिलिमिटेशन विधेयकाचे स्वागत; 150 कोटींचे आरोप फेटाळले
शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत असतील, तर तो अत्यंत चांगला निर्णय आहे. संविधानानुसार दर 20 ते 25 वर्षांनी मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) करण्याची तरतूद आहे. खासदारांना फोडण्यासाठी 150 कोटी रुपये देण्याचा संजय राऊत यांचा आरोप पूर्णपणे खोटा असून, आम्हाला पैसे देऊन खासदार फोडण्याची गरज नाही; उलट अनेक खासदार स्वतःहून पाठिंबा देण्यास तयार आहेत, असे आठवले म्हणाले.
मराठवाड्यात 1972 पेक्षा भीषण दुष्काळ; केंद्राकडे 40000 कोटींचा प्रस्ताव
धाराशिव आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना आठवले यांनी केंद्र व राज्य सरकारकडून भरीव मदतीची ग्वाही दिली. मराठवाड्यात 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारने पीक नुकसान भरपाईचे निकष लवकरात लवकर जाहीर करावेत. तसेच, केंद्र सरकारकडे 40000 कोटी रुपयांच्या विशेष मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, तो निधी मिळवण्यासाठी आपण स्वतः पत्रव्यवहार करत आहोत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बड्या कॉर्पोरेट उद्योगपतींनीही काही तालुके आणि जिल्हे दत्तक घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सोनिया गांधींचे पुस्तक, राहुल गांधींवर टीका आणि मुंबई सेंट्रलच्या नामांतराची मागणी
सोनिया गांधींच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मांडलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे तीव्र विरोध होत आहे; असे वादग्रस्त मुद्दे पुस्तकात नको होते. या पुस्तकात इंदिरा गांधींना आणीबाणी लागू केल्याचा नंतर पश्चाताप झाल्याचा उल्लेख आहे; पण आणीबाणी लादणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीला घातक पाऊल होते. मात्र, सोनिया गांधींनी इटलीच्या असूनही भारतीय जनतेने स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे, हा मुद्दा चांगला असल्याचे आठवले म्हणाले.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून अपयशी
संविधानाला कोणताही धोका नसताना राहुल गांधी केवळ राजकीय प्रचार करत आहेत. गेल्या 10 वर्षांत त्यांनी परदेशात जाऊन देशाची बदनामी केली असून, विरोधी पक्षनेते झाल्यानंतर ते अधिकच अतिरेकी आणि बेजबाबदारपणे वागत असल्याची टीका आठवले यांनी केली.
मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या
दादर स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ आणि नागपूर स्थानकाचे नाव ‘दीक्षाभूमी’ करण्याच्या मागणीचा सरकारने नक्की विचार करावा; मात्र मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांना विश्वासात घ्यावे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एखाद्या छोट्या स्थानकाला देण्याऐवजी देशभरात गाड्या जाणाऱ्या ‘मुंबई सेंट्रल’ या मोठ्या जंक्शनला द्यावे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.
———————————————-
हेही वाचा…
शरद पवार अजिबात निवृत्त होणार नाहीत!: त्यांच्या राज्यसभेची अजून 5 वर्षे बाकी आहेत; कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवेल; सुप्रिया सुळे कडाडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’मध्ये (NDA) सहभागी व्हावे, यावर पक्षात मंथन सुरू असल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील, तर ते अत्यंत संतापजनक आहे. शरद पवार निवृत्त होणार नाहीत; त्यांच्या राज्यसभेचा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे, तेव्हा ते निवृत्त कसे होतील? कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवणार,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी