![]()
पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या (एएफएमसी) कम्युनिटी मेडिसिन विभागात सार्वजनिक आरोग्यावरील तीन दिवसीय सातवी राष्ट्रीय युवा परिषद झाली. परिषदेत देशभरातील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, वैद्यकीय विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले. भारतीय प्रतिबंधात्मक आणि सामाजिक वैद्यक संघटनेच्या (आयएपीएसएम) मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेचे नाव ‘आयएपीएसएम यंग लीडर्स नॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’ होते. ‘नावीन्यपूर्ण, गतिमान आणि सक्षम : विकसित भारत २०४७ साठी भविष्यातील सार्वजनिक आरोग्य नेतृत्व’ ही परिषदेची संकल्पना होती. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. त्यांनी संशोधनावर आधारित निर्णय, नवे प्रयोग आणि विविध संस्थांमधील समन्वयाचे महत्त्व सांगितले. एएफएमसीचे संचालक व कमांडंट सर्जन व्हाइस अॅडमिरल मनीष होनवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिषदेच्या पूर्वसत्रात प्रश्नावली तयार करणे, सार्वजनिक आरोग्यात जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर, डेंग्यू नियंत्रण आणि आरोग्य तंत्रज्ञानाचे मूल्यांकन यांवर कार्यशाळा झाल्या. संशोधनासाठी निधी प्रस्ताव तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर आणि रोगांचा अंदाज वर्तवणारी प्रारूपे तयार करणे, हेही कार्यशाळांचे विषय होते. मुख्य परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, संसर्गजन्य रोगांचे सर्वेक्षण, एचपीव्ही लसीकरण आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीवर चर्चा झाली. ‘वन हेल्थ’, ग्रामीण महिलांचे आरोग्य आणि भविष्यातील आरोग्य व्यवस्थेवरही तज्ज्ञांनी मते मांडली. युवा नेतृत्व संसद, सार्वजनिक आरोग्य हॅकेथॉन, प्रश्नमंजुषा, छायाचित्रण, दृश्य कथाकथन आणि आशय निर्मिती अशा सहा स्पर्धा घेण्यात आल्या. तरुण संशोधकांनी संशोधन पेपर आणि पोस्टर सादर केले. विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.
Source link
एएफएमसीत सार्वजनिक आरोग्यावरील राष्ट्रीय युवा परिषद:एआय, रोगनियंत्रण आणि लसीकरणावर चर्चा; देशभरातील तरुण संशोधक सहभागी