Headlines

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय संघर्ष:मतदान कुणाला केले हे कळणार असल्याची मतदारांना धमकी, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप




सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनल आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच, मतदारांना मतदानाबाबत धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. तुम्ही कोणाला मतदान केले, हे तालुकानिहाय समोर येईल, अशी भीती मतदारांना दाखवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नसून, जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. भाजप पुरस्कृत पॅनलने या निवडणुकीत आघाडी घेत 19 पैकी 10 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे उर्वरित 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी भाजप पुरस्कृत पॅनलवर मतदारांवर दबाव आणण्याचा आरोप केला आहे. मतदान कुणाला केले हे समोर येणार असल्याचे सांगून मतदारांना भीती? खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीतील कथित दबावतंत्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्हा बँकेच्या मतदारांना तुम्ही तुमच्या तालुक्यातून नेमके कोणाला मतदान केले, याची माहिती समोर येईल, असे सांगितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारे मतदारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर सहकार निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र उभे करण्यात अनेक स्थानिक नेत्यांनी योगदान दिले आहे. मात्र, आता बाहेरून येणारे नेते या स्थानिक नेत्यांना दमबाजी करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेत्यांची अशी अवस्था का झाली, असा सवालही मोहिते पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे उर्वरित जागांसाठी होणाऱ्या मतदानात मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये आणि मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी, हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरत आहे. मोहिते पाटील यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून काय भूमिका मांडली जाते, याकडेही लक्ष लागले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे; संस्थांच्या मुद्द्यावरून जुंपली दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील आणि भाजप नेत्यांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मोहिते पाटील यांच्या संस्थांवरून होत असलेल्या आरोपांनाही आता प्रत्युत्तर दिले जात आहे. माजी अध्यक्ष आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही कोणत्या संस्था बुडवल्या, हे आधी स्पष्टपणे सांगावे, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून पाच वर्षे काम करत असताना मोहिते पाटील यांच्या संस्थेला एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे संस्थांच्या मुद्द्यावरून होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना, ‘चोराने सांगावे मी कुठे चोरी केली,’ अशा शब्दांत निशाणा साधला. मोहिते पाटील यांनी बुडवलेल्या संस्थांची यादी जिल्ह्यातील नेतेच जाहीर करतील, असेही गोरे यांनी म्हटले. सोलापुरातील भाजपचे उमेदवार आणि त्यांचे सहकारी मोहिते पाटील यांना राजकीयदृष्ट्या उत्तर देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आपली ताकद वापरण्याची गरज नसल्याचा टोलाही जयकुमार गोरे यांनी लगावला. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मतदानासोबतच संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवरूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 19 पैकी 10 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार बिनविरोध सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात एकूण 19 जागा आहेत. त्यापैकी भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीमुळे बँकेच्या सत्तासमीकरणात भाजप पुरस्कृत पॅनलने महत्त्वाची आघाडी घेतली आहे. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय माजी आमदार प्रशांत परिचारक, शंभूराजे जगताप, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर अवताडे, पृथ्वीराज माने आणि श्रीदीप हसापुरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतील नेत्यांची समीकरणे एकत्र आल्याचे चित्र आहे. 26 नोव्हेंबरला मतदान, 27 नोव्हेंबरला मतमोजणी संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी 10 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 9 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 27 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. बिनविरोध निवडीमुळे भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलला दहा जागा मिळाल्या असल्या, तरी उर्वरित नऊ जागांवरील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मोहिते पाटील गटाने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर कोणत्या गटाला किती यश मिळते, यावर जिल्हा बँकेतील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. हेही वाचा…. ‘सरकार म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!:मामाच्या मुलीशी लग्नाच्या चर्चेवर छोटा पुढारी संतापला मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर कायदेशीर बंदी घालता येईल का, या मुद्द्यावर सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे. रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे पुढील पिढीच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने या प्रकरणात कायदा करण्याची शक्यता तपासण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, बिग बॉस फेम आणि आपल्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असलेला छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरोडे यानेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या भूमिकेवर उपरोधिक टीका करत त्याने तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. ‘सरकार उद्या म्हणेल, तरुण पोरांची नसबंदी करून घ्या!’ असा टोला त्याने लगावला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *