![]()
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 296.05 येथे मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स बसची धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस बाजूच्या लोखंडी डिव्हायडरला धडकून दोन्ही डिव्हायडरच्या मध्ये घुसली. या अपघातात गौरव शरदचंद्र पांडे(वय 29,तुमसर, भंडारा) यांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस क्रमांक (MH 09 GJ 7315) ही नागपूर येथून मुंबईकडे जात होती. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 296.05 मुंबई कॉरिडॉर(मेहकर पोलिस स्टेशन हद्द)येथे बस चालक शिवानंद हांचिनायटी (वय 35, रा. नागपूर) हे समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना बसची समोरील वाहनाला धडक बसली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस बाजूच्या लोखंडी डिव्हायडरला धडकून दोन्ही डिव्हायडरच्या आत जाऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातात गौरव पांडे हे बसच्या डाव्या बाजूने बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओमप्रकाश यादव (वय 58, रा. नागपूर), इब्राहिम अहमद खान (वय 36, रा. नवी मुंबई), इशिका रामदास कावलकर (वय 36, रा. नागपूर) आणि मीनाक्षी राजगुरू (वय 62, रा. नागपूर) हे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती दि. 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12.37 वाजता सीआरओ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून फोनद्वारे समृद्धी महामार्ग पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच मलकापूर पोलिस केंद्र टॅब अंतर्गत वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रात्री 12.47 वाजता पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी चारही प्रवाशांना तातडीने सरकारी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तसेच मृत गौरव पांडे यांचा मृतदेहही सरकारी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे रवाना करण्यात आला. ट्रॅव्हल्स बसमधील इतर प्रवाशांना सरकारी वाहनातून आयसी-11 फरदापूर टोल नाका येथे सुरक्षितपणे सोडण्यात आले. या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक आणि वाहक यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनास्थळी महामार्ग पोलिस एपीआय राहुल पाटील यांच्यासह एचसी आराख बीएन 1214, पोलिस कॉन्स्टेबल 2576, 71, 477, 2611, मंगेश खडसे,तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन जवान,मेहकर चे पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल , कर्मचारी लक्ष्मण कटक मोहम्मद परसवाले बद्रीनाथ शिंदे सह मेहकर पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.समृद्धी महामार्गावरील या अपघातामुळे ओव्हरटेक करताना वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Source link
समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ भीषण अपघात:एकाचा जागीच मृत्यू, चौघे किरकोळ जखमी