![]()
सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई केल्याने वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना हनुमान टेकडी आणि स्वारगेट परिसरात घडली. हनुमान टेकडी परिसरात दारू पिणाऱ्या एकाला हटकल्याने दोघांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार २५ वर्षीय तरुण हा पांडवनगर भागात राहायला आहे. तो आणि त्याचा मित्र हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्या वेळी एक जण तेथे दारू पित होता. तरुणाकडे आरोपीने काडीपेटी मागितली. तरुणाला त्याला नकार दिला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नको. या भागात नागरिक फिरायला येतात, असे तरुणाने आरोपीला सांगितले. आरोपीने तक्रारदार तरुण आणि त्याच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखविला. तरुणासह त्याच्या मित्राला काठीने मारहाण केली. दोघांवर शस्त्राने वार केले. या घटनेत तक्रारदार तरुणासह त्याच्या मित्र जखम झाले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक एन जाधव तपास करत आहेत. स्वारगेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांना मनाई केल्याने एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी साहिल मनाोज चव्हाण (वय २६, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) याच्यासह मनोज नावाच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे स्वारगेट भागातील पुरंदर काॅम्प्लेक्स परिसरात राहायला आहेत. २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी रस्त्यावर दारू पित होते. तक्रारदाराने आरोपींना सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई केली. या कारणावरुन आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केली. त्यांना कुंडी फेकून मारली. सहायक पोलीस निरीक्षक एन पाटील तपास करत आहेत.
Source link
दारू पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाण:पुण्यात हनुमान टेकडी आणि स्वारगेट परिसरातील दोन घटना; दोघांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण