![]()
‘रामायण’ चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद वगळून पुन्हा प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे केली आहे. चित्रपटात प्रभू श्रीरामांचे अवमूल्यन आणि रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप संस्थेने केला आहे. संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत ही मागणी केली. चित्रपटात प्रभू श्रीराम राक्षसांना घाबरून पळताना, तर शूर्पणखेचे नाक कापल्यानंतर माता सीता लक्ष्मणाला खडसावताना दाखवल्याचा आक्षेप संस्थेने घेतला. रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि महिलांचा रक्षक म्हणून दाखवून त्याचे महिमामंडन केल्याचा आरोपही करण्यात आला. हे प्रसंग रामायणातील मूळ कथेशी विसंगत असल्याचे वर्तक म्हणाले. सिनेमॅटोग्राफ अधिनियमातील कलम ५-ब आणि प्रमाणनाच्या नियमांनुसार धार्मिक समूहांचा अवमान करणाऱ्या दृश्यांना मनाई असताना चित्रपटाला प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल वर्तक यांनी केला. अन्य धर्मांच्या भावनांबाबत सेन्सॉर बोर्ड जागरूक असते, मात्र हिंदूंच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तेव्हा सुरुवातीला आक्षेप ऐकून घेण्यास नकार देण्यात आला. पुरावे सादर केल्यानंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दीपा सुब्रमण्यम यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कळवून योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याचे वर्तक यांनी सांगितले. निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी क्रांती पेटकर यांनी केली. तोपर्यंत हिंदूंनी चित्रपट पाहू नये, असे आवाहनही करण्यात आले. पत्रकार परिषदेला ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज आणि प्रा. विठ्ठल जाधव उपस्थित होते. आगामी ‘रामायण भाग-२’चे धार्मिक तज्ज्ञांकडून परीक्षण करावे, अन्यथा देशभर आंदोलन छेडू, असा इशाराही संस्थेने दिला.
Source link
‘रामायण’मधील दृश्ये वगळण्याची सनातन संस्थेची मागणी:सेन्सॉर बोर्डावर हिंदूंच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; निर्माते-दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी