Headlines

शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला सांगलीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध:राजू शेट्टींचा 8 तास ठिय्या, 800 पोलिसांचा फौजफाटा आणि अधिकारी मोजणी न करताच माघारी




शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन आणि जमीन मोजणीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. कोल्हापूर जिल्ह्यानंतर आता सांगली जिल्ह्यातही या महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा रोष तीव्र होताना दिसत आहे. खानापूर तालुक्यातील माहुली येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे मोजणीची प्रक्रिया पूर्ण न करताच माघारी फिरावे लागले. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसह सकाळी 9 वाजल्यापासून तब्बल 8 तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दिवसभर प्रशासन आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर सुमारे 800 पोलिसांचा बंदोबस्त आणि संबंधित अधिकारी कोणतीही मोजणी न करता परतले. मोजणी सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न, शेतकऱ्यांचा आक्रमक विरोध शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गात खानापूर तालुक्यातील माहुली, नागेवाडी आणि भाग्यनगर परिसरातील शेतजमिनी येत आहेत. या जमिनी सुपीक असल्याने त्या महामार्गासाठी संपादित करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली शेती महामार्गासाठी गमवावी लागेल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जमीन मोजणी होऊ नये, यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली. दरम्यान, जमीन मोजणीसाठी उपविभागीय अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात माहुली येथे दाखल झाले होते. मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून दिवसभर अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत या प्रक्रियेला विरोध केला. राजू शेट्टी यांनीही आंदोलनस्थळी ठाण मांडत प्रशासनाला मोजणी करू दिली नाही. सकाळपासून सुरू असलेले हे आंदोलन तब्बल आठ तास सुरू राहिले. मोजणीची यंत्रे फोडली; परिसरात तणावाचे वातावरण आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचा संताप वाढल्याचे पाहायला मिळाले. जमीन मोजणीसाठी प्रशासनाकडून आणण्यात आलेली यंत्रे संतप्त आंदोलकांनी ताब्यात घेतली. त्यानंतर ही यंत्रे जागेवरच फोडण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाकडून पोलीस संरक्षणात मोजणी करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र शेतकऱ्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे दिवसभर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही अधिकाऱ्यांना मोजणी पुढे नेता आली नाही. अखेर प्रशासनाने मोजणीची प्रक्रिया थांबवत घटनास्थळावरून माघार घेतली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना घेतले होते ताब्यात मोजणीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीपासूनच खबरदारी घेतली होती. आंदोलनातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास पोलिसांनी काल रात्रीपासून सुरुवात केली होती. शक्तीपीठ महामार्गविरोधी आंदोलनाशी संबंधित काही प्रमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, दुसरीकडे माहुली येथे शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने जमलेली उपस्थिती आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरा ताब्यात घेतलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकजूट; मोजणी रोखण्याचा निर्धार माहुली येथील आंदोलनानंतर सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गविरोधी लढ्याला आणखी धार येण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त जमीन मोजणी होऊ द्यायची नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. प्रशासनाकडून उद्यापासून जिल्ह्यातील अन्य गावांमध्ये मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध करावा, असे आवाहन आंदोलनातून करण्यात आले आहे. एका गावापुरते आंदोलन मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून प्रशासनासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. काय आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प? नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणारा हा प्रस्तावित सहापदरी द्रुतगती महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी म्हणजेच गोवा सीमेजवळ जोडला जाणार आहे. या महामार्गाची सुधारित लांबी सुमारे 856 किलोमीटर असून, नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी सध्याच्या सुमारे 18 तासांवरून 7 ते 8 तासांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, या प्रकल्पासाठी होणारे भूसंपादन हा वादाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून सुपीक जमिनी महामार्गासाठी जाणार असल्याने विरोध केला जात आहे. महामार्गामुळे शेती, उत्पन्न आणि स्थानिक जीवनमानावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागत आहे. माहुलीतील आठ तासांच्या आंदोलनामुळे सांगली जिल्ह्यातील हा विरोध पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. प्रशासन महामार्गाच्या कामासाठी मोजणी प्रक्रिया पुढे नेण्याच्या प्रयत्नात असताना शेतकऱ्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत जमीन मोजणी होऊ न देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा सांगली जिल्ह्यातील मार्ग सुकर होण्याऐवजी आंदोलनामुळे अधिकच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द:पुण्यात FDA ची मोठी कारवाई, परवानगीशिवाय उत्पादन आणि विक्री केल्याचे उघड तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरूच ठेवले आहे. सुरुवातीला हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर आता मुंढे यांनी आपला मोर्चा औषध उत्पादन कंपन्यांकडे वळवला आहे. पुण्यातील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ या कंपनीवर एफडीएने मोठी कारवाई करत तिचा औषध उत्पादन परवाना रद्द केला आहे. कंपनीची नऊ औषधे अप्रमाणित आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *