Headlines

शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात!:सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार प्रहार; 21 जून 2022 रोजी मूळ पक्ष कोणाचा हेच ठरवावे लागेल




शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने बुधवारी (25 नोव्हेंबर) अत्यंत निर्णायक वळण घेतले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर दोन्ही बाजूंचा मुख्य युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तिवाद (रिजॉइंडर) करताना एकनाथ शिंदे गटाच्या ‘निवडणूकपूर्व युती’ आणि ‘विधानसभा कार्यकाळ समाप्ती’ या युक्तिवादांची चिरफाड केली. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत, “त्यावेळी तरी भाजप आणि राष्ट्रवादीची कोणती निवडणूकपूर्व युती होती? महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील अडीच वर्षे मंत्रिपद भोगत होते, तेव्हा त्यांना विचारधारा का आठवली नाही?” असा सणसणीत सवाल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला. पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत शिंदे गटाच्या ‘युती’च्या युक्तिवादाची हवा काढली उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये निवडणूकपूर्व युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. त्यावर कपिल सिब्बल यांनी जोरदार पलटवार केला. 2019 च्या सत्तानाट्याचा क्रम 21 नोव्हेंबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण नाकारले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली; त्यावेळी तरी त्या दोघांची निवडणूकपूर्व युती होती का? 2022 पर्यंत शिंदे गटाला आघाडी का आवडत होती? फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि 2019 ते 2022 या काळात एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदे उपभोगली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांना ही आघाडी चुकीची वाटू लागली. ज्या लोकांची राष्ट्रवादीसोबत कोणतीही निवडणूकपूर्व युती नव्हती, ते आज विचारधारेच्या गोष्टी करत आहेत. विधिमंडळातील बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे; 21 जून 2022 ची स्थिती महत्त्वाची! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या निर्णयावर बोट ठेवत सिब्बल यांनी घटनात्मक मुद्दे मांडले. विधानसभा अध्यक्षांनी 55 पैकी 37 (तसेच 26 जूनच्या ठरावातील 31) आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटच खरा राजकीय पक्ष असल्याचे घोषित केले. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ‘सुभाष देसाई’ घटनापीठाच्या निकालाशी थेट विसंगत आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार विधिमंडळातील बहुमत मूळ राजकीय पक्ष ठरू शकत नाही आणि पक्षापेक्षा मोठेही असू शकत नाही. असहमती (डिसेंट) नव्हे, तर सरकार पाडण्याचे षडयंत्र पक्षात मतभेद असतील तर पक्षाची संघटनात्मक बैठक बोलावून चर्चा केली जाते. मात्र, “मी तुम्हाला नेताच मानत नाही, आता मीच नेता आणि माझाच व्हिप चालेल” असे म्हणत गुवाहाटीला जाणे आणि भाजपच्या मदतीने 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे, हा पक्षातला मतभेद नसून सरकार पाडण्याचे व स्वेच्छेने पक्षसदस्यत्व सोडण्याचे कृत्य आहे. त्यामुळे 21 जून 2022 रोजी पक्षांतराची पहिली कृती घडली, त्या दिवशी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्वलक्षी लागू होत नाही विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत आयोगासमोरील कार्यवाही या दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र आहेत. निवडणूक आयोगाने नंतर दिलेली मान्यता भविष्यकाळासाठी (प्रॉस्पेक्टिव्ह) लागू होते; त्या आधारे पूर्वी घडलेला पक्षांतराचा गुन्हा माफ होऊ शकत नाही. व्हीप बजावल्याची कबुली प्रतिज्ञापत्रात दिली, आता मात्र नाकारताय! – ई-मेलचा पुरावा कोर्टात सादर व्हीप बजावला गेला नसल्याचा शिंदे गटाचा दावा कपिल सिब्बल यांनी कागदपत्रांसह खोडून काढला. 37 आमदारांकडून व्हिपचे उल्लंघन: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (मविआ) अधिकृत उमेदवार राजन साळवी असतानाही शिंदे गटाच्या 37 आमदारांनी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आणि विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने कौल दिला. ई-मेल पत्त्यांची कबुली: सुनील प्रभू यांनी 22 जून रोजी बजावलेला व्हिप मिळाला नसल्याचा दावा शिंदे गट करत असला, तरी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्वतःच्या उत्तरात सर्व आमदारांनी आपले अधिकृत ई-मेल आयडी आणि त्यावर नोटीस आल्याची कबुली दिली आहे. स्वतःच्याच कबुलीविरोधात वकील युक्तिवाद करू शकत नाहीत, असे सिब्बल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणून अपात्रतेच्या याचिका निष्फळ ठरू शकत नाहीत 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने अपात्रतेच्या याचिका निरर्थक झाल्या आहेत आणि दहावी अनुसूची केवळ विद्यमान आमदारांना लागू होते, या शिंदे गटाच्या नवीन युक्तिवादावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘सदस्य’ शब्दाच्या व्याख्येचा चुकीचा अर्थ जेव्हा आम्ही 23 जून 2022 रोजी अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या, जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारी 2024 रोजी निकाल दिला आणि जेव्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात आलो, तेव्हा हे सर्व जण विद्यमान आमदार होते. अपात्रतेची कार्यवाही सुरू करताना ती व्यक्ती आमदार असणे आवश्यक असते; नंतर विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा ‘न्यायिक पुनरावलोकनाचा’ (ज्युडिशियल रिव्ह्यू) अधिकार संपुष्टात येऊ शकत नाही. अन्यथा चार-पाच आमदारांच्या बळावर कोणतेही सरकार पाडून कार्यकाळ संपेपर्यंत प्रकरण लांबवण्याची घातक प्रथा पडेल, असा इशारा सिब्बल यांनी दिला. दरम्यान, आजची सुनावणी पूर्ण झाली असून उद्या पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर युक्तिवाद संपवण्याचे संकेत दिले असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या ऐतिहासिक प्रकरणाचा अंतिम निकाल येण्याची शक्यता विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *