आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आयोजित १५वा आरोग्य चित्रपट महोत्सव ३ ते ५ डिसेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यंदा अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण हा महोत्सवाचा मुख्य विषय आहे.
.
पी. एम. शाह फाऊंडेशनतर्फे विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक अॅड. चेतन गांधी यांनी ही माहिती दिली. देश-विदेशातून आलेल्या सुमारे १५० प्रवेशिकांमधून निवडलेले ५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक लघुपट दाखवले जातील. महोत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेशशुल्क नाही.
३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता डॉ. अभय बंग यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी ते ‘आरोग्य स्वराज्य’ या संकल्पनेवर उपस्थितांशी संवाद साधतील. मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधवही उपस्थित असतील.
उद्घाटनानंतर ‘फिर जिंदगी’ हा चित्रपट दाखवला जाईल. आयटीसीसी निर्मित या चित्रपटात रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत ‘सिनेमा फॉर चेंज’ विषयावर चर्चासत्र होईल. अभिनेते डॉ. मोहन आगाशे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि वीरेंद्र वळसंगकर यात सहभागी होतील. समाजावर प्रभाव टाकण्याची आणि सकारात्मक बदल घडवण्याची सिनेमाची ताकद यावर ते विचार मांडतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आरोग्यविषयक लघुपट दाखवले जातील.
५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत अभिनेत्री आणि लेखिका मधुरा वेलणकर-साटम यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी उत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार दिले जातील.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर, नीता मेहता आणि अनुजा देवधर यांच्या परीक्षक मंडळाने महोत्सवातील चित्रपटांचे परीक्षण केले आहे.
