केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. “संजय
.
महाराष्ट्र आणि मोठ्या राज्यांतील जागांमधील तफावत 48 पर्यंत वाढणार
डिलिमिटेशन विधेयकामुळे महाराष्ट्राचे संसदेतील महत्त्व कसे कमी होईल, याचे गणित आदित्य ठाकरे यांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केले. सध्याच्या गणनेनुसार जर मतदारसंघांमध्ये सरासरी 50 टक्के वाढ केली, तरी देशातील सर्वात मोठ्या राज्यातील (उत्तर प्रदेश) आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांमधील फरक प्रचंड वाढणार आहे. पूर्वी हा फरक 30 ते 32 जागांचा होता, तो आता थेट 48 जागांवर जाऊन पोहोचेल; विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या एकूण जागाच 48 आहेत. म्हणजेच, संपूर्ण महाराष्ट्राच्या सध्याच्या खासदार संख्येइतका फरक एका राज्याशी पडणार असून, हा स्वाभिमानी महाराष्ट्रावर मोठा अन्याय आहे.
भाजपच्या स्वार्थी राजकारणाला झुकणार नाही
‘इंडिया’ (INDIA) आघाडीची भूमिका हीच देशहिताची भूमिका आहे. या विधेयकामुळे देशाचे किंवा जनतेचे कोणतेही भले होणार नसून हा केवळ भाजपचा स्वार्थी विचार आहे; आम्ही या स्वार्थाला बळी पडणार नाही आणि त्यांच्यासमोर झुकणारही नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

850 खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी मिळणार का?
नवीन खासदारांच्या वाढत्या संख्येमुळे संसदीय कामकाजावर आणि सरकारी तिजोरीवर होणाऱ्या परिणामांकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. आज 540 ते 550 खासदार असतानाही प्रत्येक खासदाराला सभागृहात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मग 850 खासदार झाल्यावर प्रत्येकाला बोलायची संधी कशी मिळणार? हा जनतेचा आवाज हिरावून घेण्याचा प्रकार आहे.
वेतन व भत्त्यांचा खर्च वाढवून करदात्यांवर बोजा
खासदारांची संख्या 850 वर नेल्यास त्यांचे पगार, भत्ते (पर्क्स) आणि इतर सुविधांचा प्रचंड आर्थिक बोजा सामान्य करदात्यांच्या खिशावर पडणार आहे. त्यापेक्षा विद्यमान खासदारांचे फ्लॅट आणि विकासनिधी (एमपी फंड) दुप्पट करावेत, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.
उत्तर प्रदेश-पंजाबच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलण्याचा डाव!
2023 मध्ये सर्व विरोधी पक्षांनी देशहितासाठी महिला आरक्षण विधेयकाला एकमुखाने पाठिंबा दिला होता आणि 2019 पासूनच 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. आज 540 किंवा 550 जागांमध्ये 33 टक्के आरक्षण दिले तर महिलांना सभागृहात अधिक प्रभावी आवाज मिळाला असता; मात्र 850 जागांमध्ये 33 टक्के हे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी ठरते, म्हणजेच भाजप महिलांचीही फसवणूक करत आहे.
सपाच्या लाटेच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलण्याचा कट
उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या भाजप जिंकू शकत नाही आणि तिथे समाजवादी पक्षाची (सपा) लाट आहे. त्यामुळे डिलिमिटेशनच्या नावाखाली उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुका किमान 6 महिने पुढे ढकलण्याचा भाजपचा डाव असल्याचा संशयही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शरद पवार गटाच्या भूमिकेवर भाष्य करण्यास नकार
डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा संभाव्य पाठिंबा आणि ‘इंडिया’ आघाडीतील मतभेदांबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उबाठा) पाठिंब्यामुळेच शरद पवार राज्यसभेवर गेले आणि त्यांचे खासदार निवडून आले हे सत्य असले तरी, मी आज कोणावरही वैयक्तिक किंवा इतर पक्षाच्या भूमिकेवर भाष्य करणार नाही. माझे एखादे विधान डिलिमिटेशनच्या मुख्य मुद्द्यापेक्षा जास्त गाजावे असे मला वाटत नाही; सध्या या कायद्यामुळे देशाचे होणारे नुकसान प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता आहे. तसेच, यवतमाळमध्ये 50000 झाडे तोडली जाणार असल्याच्या प्रश्नावरही डिलिमिटेशननंतर सविस्तर बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले.
———————————————————
हेही वाचा…
राज ठाकरेंनी 2023 मध्येच केली होती भविष्यवाणी:”पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने गेली, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!”

केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे शनिवारी (28 नोव्हेंबर) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी शरद पवार गटाच्या या संभाव्य भूमिकेवर ‘पाठीत खंजीर खुपसला’ अशा शब्दांत टीका सुरू केलेली असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 जुलै 2023 रोजी केलेले एक जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी