![]()
राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि संविधान दिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) ठाण्यातून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. “गेल्या 2 महिन्यांत मुंबई, पुणे, ठाणे आणि चिपळूणमध्ये गोळीबार व भरदिवसा हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. कधीकाळी जगात नावाजलेल्या मुंबई पोलिसांचा आज धाक उरलेला नाही; राज्यात ‘चोर-चोर मौसेरे भाई’ म्हणजेच गुंड आणि पोलिसांचे संगनमत झाले आहे. गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले असून विद्यमान गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा,” अशी आक्रमक मागणी सपकाळ यांनी केली. यावेळी त्यांनी कुंभमेळा नगरीतील 36000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेस आणि संपूर्ण ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचा कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले. गृहखाते केवळ हप्ते वसुलीसाठी उरलेय मुंबई आणि पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याऐवजी पोलीस प्रशासन आंदोलकांवर कारवाई करण्यात आणि त्यांचे सोशल मीडिया तपासण्यात व्यस्त आहे. ‘यह सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है’ अशी सध्याची वस्तुस्थिती आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावे असे म्हटले असले, तरी अजित पवार खमके नेते असूनही त्यांच्या काळात कोयता गँग होतीच आणि मुख्यमंत्री मात्र ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत होते. त्यामुळे राज्याला आता पूर्णवेळ गृहमंत्र्यांची नितांत गरज आहे. कुंभमेळा आणि चवदार तळ्याच्या कामात भ्रष्टाचार राज्यात चोहीकडे भ्रष्टाचार पसरला आहे. कुंभमेळा नगरी ही आता भ्रष्टाचाराची नगरी बनली असून तिथे 36000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या 100 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातही भ्रष्टाचार सुरू आहे, तर पाटण येथील प्रकल्पाला प्रशासनाने स्थगिती देऊनही काम बेधडक सुरू आहे. ’50 खोके एकदम ओके’ आणि पक्ष फोडाफोडीच्या या सर्व घाणेरड्या राजकारणाची जबाबदारी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची आहे. डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; सुप्रिया सुळेंची बदलती भूमिका लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी बदललेल्या भूमिकेवर भाष्य करताना सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका रोखठोक मांडली. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी 50-50 टक्के जागावाढीच्या अटीवर डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याची भाषा केली होती आणि आता देशहिताची भाषा करत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाच्या मते हे डिलिमिटेशन विधेयक पूर्णपणे देशविरोधी, राष्ट्रविघातक आणि लोकशाहीतील प्रतिनिधित्वाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. केवळ काँग्रेसच नव्हे, तर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत. स्वतःला हव्या तशा जागा आखून जातीयवाद, ध्रुवीकरण आणि दंगली घडवून सत्तेत टिकून राहण्याचा हा भाजपचा कुटील डाव आहे. संजय राऊतांच्या सूचनेवर संवाद साधणार विरोधकांनी आत्मचिंतन करून काही मुद्द्यांवर एकत्र यावे, या संजय राऊत यांच्या सूचनेचे स्वागत करत त्यांच्याशी नक्कीच संवाद साधला जाईल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. भाजपचे संविधानावरचे प्रेम म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’ संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित राज्यस्तरीय ‘संविधान बचाव’ रॅलीचे कारण स्पष्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. संविधान सभेतील 300 सदस्यांनी, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील 230 सदस्यांनी देशाला हे महान संविधान दिले. तेव्हा भाजप अस्तित्वातही नव्हता; मात्र संघप्रमुख गोळवलकर गुरुजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून संविधानाऐवजी ‘मनुस्मृती’ लागू करण्याची मागणी करत होते. ‘बंच ऑफ थॉट्स’ला मानणाऱ्या भाजपला आज संविधानाचा आलेला पुळका म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे. पक्षांतर बंदी कायद्याची पायमल्ली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आणलेला आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी मजबूत केलेला पक्षांतर बंदी कायदा भाजपने पायदळी तुडवला आहे. भाजपला संविधानाचा खरा आदर असेल, तर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांसारख्या राज्यपालांच्या नेमणुकीबद्दल देशाची माफी मागावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना घरचा रस्ता दाखवावा. असंवैधानिक सरकारचा जन्म ठाण्यातूनच झाला राज्यातील मागील असंवैधानिक सरकारची सुरुवात ठाण्यातूनच झाली होती आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच ठाण्यात सध्या भरदिवसा खून पडत असून कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळे संविधान रक्षणाचा एल्गार पुकारण्यासाठी ठाण्याहून अधिक योग्य जागा दुसरी कोणतीही असू शकत नाही, म्हणूनच आम्ही ठाण्यातून ही रॅली काढत आहोत, असे सपकाळ यांनी ठामपणे सांगितले. ——————————————– हेही वाचा… राज्यात ज्याच्याकडे ‘मॅजिक नंबर’, तोच मुख्यमंत्री होऊ शकतो:मी कुणाची लेक आहे विसरू नका, सुप्रिया सुळेंची रोखठोक भूमिका; प्रकाश आंबेडकरांनाही प्रत्युत्तर “मी कोणाची लेक आहे हे विसरू नका, मी वास्तवतेत जगते. शरद पवार यांची गेल्या 40 वर्षांतील वक्तव्ये काढून पाहा; राज्यात ज्याच्याकडे ‘मॅजिक नंबर’ असतो, तोच मुख्यमंत्री होऊ शकतो. एखाद्याने काहीतरी बालिश लिहिले म्हणून मी अशा ‘गॉसिप’मध्ये वेळ घालवणार नाही,” अशा सडेतोड शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर आणि शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्या विधानावर गुरुवारी (26 नोव्हेंबर) मुंबईत प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या राज्यस्तरीय दुष्काळ आढावा बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा दाखला देत, महाराष्ट्रात गुन्हेगारीत पुणे शहर नंबर 1 वर असल्याची चिंता व्यक्त केली. यासोबतच त्यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी, प्रकाश आंबेडकर व अंजली आंबेडकर यांनी केलेली टीका आणि राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाच्या न्यायालयीन लढाईवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
राज्यात 'चोर-पोलीस मौसेरे भाई' अशी स्थिती:अपयशी गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा; कुंभमेळ्यात 36000 कोटींचा भ्रष्टाचार -हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल