Headlines

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल:15 दिवसांपूर्वीही बिघडली होती प्रकृती, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सोडून तातडीने रुग्णालयात पोहोचल्या




राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक अर्धवट सोडली आणि तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीची नियमित काळजी घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले होते. त्यानंतर उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज पुन्हा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे धावल्या शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक आणि आगामी राजकीय रणनीतीसंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र, वडील शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोणताही विलंब न करता ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 15 दिवसांपूर्वीही प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार दरम्यान, शरद पवार यांना यापूर्वीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. साधारण 15 दिवसांपूर्वी, दिवाळीच्या काळात त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईत आले होते. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना काही काळ प्रवास टाळण्याचा आणि प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी हळूहळू आपल्या नियमित कामकाजाला सुरुवात केली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते राजकीय घडामोडी आणि विविध विषयांवरील चर्चांमध्ये सहभागी होत होते. नुकतेच त्यांनी पुण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून ऊस उत्पादनासंदर्भात करण्यात आलेल्या प्रयोगाची आणि माहितीची पाहणी केली होती. शेती, सहकार आणि राजकारण या विषयांवरील त्यांचा सहभाग पुन्हा सुरू झाला होता. मात्र, आज नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत असले, तरी डॉक्टरांच्या तपासणीनंतरच पुढील वैद्यकीय स्थिती स्पष्ट होणार आहे. सुप्रिया सुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्या काय माहिती देतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वृत्त वाचा विद्येचे माहेरघर आता गुंडांचे माहेरघर झाले:राज्यात कायद्याचे राज्य राहिले नाही, गृहमंत्रालय अपयशी, भाजपकडून गुंडांना आश्रय, मुंबईतील व्यापारी दहशतीखाली- संजय राऊत
पुणे हे विद्येचे माहेरघर होते, ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत? नागपुरातसुद्धा असेच वातावरण आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, म्हणजेच गृहमंत्रालय अपयशी ठरले आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्यांच्याकडे हे खाते आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *