“शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्र सत्तेत आले, तर आम्हा सर्वांनाच मनापासून आनंद होईल. शरद पवार हे कधीही निवृत्त होऊ शकत नाहीत; मी आणि एकनाथ शिंदे जेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हाही आम्ही त्यांना थोडा आराम करण्याचा सल्
.
संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने राज्यातील 11 गडकिल्ल्यांवर आयोजित स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने ते शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यापासून ते पुणे जिल्हा बँक निवडणूक, मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी (SIT) चौकशी आणि संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांवर रोखठोक भाष्य केले.
डिलिमिटेशन काळाची गरज; पवारांनीच सर्वप्रथम 33 टक्के महिला आरक्षण आणले!
संसदेतील डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला शरद पवार गटाने दिलेल्या पाठिंब्याचे सचिन आहिर यांनी स्वागत केले. आज राज्यात एक मतदारसंघ 4 ते 5 लाख लोकसंख्येचा आहे, तर दुसरा मतदारसंघ 2 ते 3 लाख लोकसंख्येचा आहे; मात्र दोघांनाही समान विकासनिधी मिळतो. हा मोठ्या मतदारसंघांतील नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) होणे ही काळाची गरज आहे.

पवारांचे ऐतिहासिक योगदान
महिला आरक्षणाबाबत शरद पवार यांची नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वप्रथम 33 टक्के महिला आरक्षण आणण्याचे काम शरद पवार यांनीच केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. राष्ट्रीय हिताच्या विधेयकांना त्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला याचा अर्थ ते लगेच सरकारमध्ये आले असा होत नाही; मात्र पवार आणि शिंदे एकत्र सत्तेत आल्यास आम्हा सर्वांनाच आनंद होईल. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचे केलेले आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी असून ते कधीही सिद्ध झालेले नाहीत, असेही आहिर म्हणाले.
नागपूर अधिवेशन 2 आठवड्यांचे; शेतकऱ्यांचे प्रश्न आणि 10 ते 12 महत्त्वाची विधेयके पटलावर येणार
आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या नियोजनाबाबत माहिती देताना सचिन आहिर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची आमची भूमिका राहील. केंद्राची पथके पाहणी करून गेली आहेत; त्यातून मिळणारी मदत आणि राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही, यावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल.
10 ते 12 विधेयके आणि कामकाज सल्लागार समितीचा निर्णय
हे अधिवेशन 2 आठवड्यांचे असणार असून यात महसूल विधेयकासह 10 ते 12 महत्त्वाची विधेयके मंजूर केली जातील. विरोधी पक्षांनी गोकुळ किंवा इतर मुद्दे नियमानुसार मांडल्यास त्यावर नक्कीच चर्चा होईल. आवश्यकता भासल्यास कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी मी स्वतः 6 तारखेला नागपूरला जाऊन पाहणी करणार असून तिथे पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
पुणे जिल्हा बँकेसाठी महायुतीचा विचार करू
मुंबई बँकेच्या यशानंतर आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) निवडणुकीसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे आहिर यांनी सांगितले. पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मी, उद्योगमंत्री उदय सामंत आणि रमेशआप्पा थोरात यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. आमचे नेते शरददादा सोनवणे आणि विजय शिवतारे हेदेखील सक्रिय झाले असून खेड आणि आंबेगाव तालुक्यांतून ठराव जमा करण्याचे काम सुरू आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करू; मात्र स्वतंत्र लढण्याची वेळ आली तरी आम्ही पूर्ण ताकदीने लढू.
बाबाजी काळे यांची भेट केवळ विकासकामांसाठी
खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी उदय सामंत व माझी घेतलेली भेट ही केवळ मतदारसंघातील एमआयडीसी (MIDC) व पीएमआरडीएचे (PMRDA) रस्ते आणि प्रलंबित डीपीआर (DPR) मार्गी लावण्यासाठी होती. जनतेची कामे करण्यासाठी कोणत्याही पक्षाचा आमदार भेटल्यास त्याला मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, यात कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ नाही. तसेच, रवींद्र धंगेकर यांची विधाने वैयक्तिक असून मी, उदय सामंत आणि नीलमताई गोऱ्हे समन्वयाने पुण्याची जबाबदारी सांभाळत आहोत.
11 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम
‘गडाचा मान आणि संविधानाचा सन्मान’ या उपक्रमांतर्गत आज संविधान दिनी प्रदूषण विभागाच्या वतीने मी स्वतः किल्ले शिवनेरीवर, तर भरतशेठ गोगावले व इतर मंत्री राजगड, लोहगड अशा उर्वरित 10 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत. भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोडीबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) आणि शासनाने दखल घेतली असून विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
संजय शिरसाटांचे काम विरोधकांना खुपतेय
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे तालुका व जिल्हा पातळीवर मोठे काम करत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. 10 कोटींच्या प्रस्तावावरून कोणतेही ठोस पुरावे न देता केवळ रोज नवीन आरोप करणे योग्य नाही; शिरसाटांनी त्याला चोख उत्तर दिले आहे. पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.
जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासणार
मनोज जरांगे पाटील यांनी 5 ठिकाणी चौकशीला सामोरे जात एसआयटीच्या (SIT) पथकाला मोबाईलमधील ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. या क्लिपचा मूळ स्त्रोत आणि तिची सत्यता तपासण्यासाठी ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली जाईल आणि त्यानंतर तिचे धागेदोरे कोठपर्यंत जातात, याचा सखोल तपास होईल, असेही सचिन आहिर यांनी स्पष्ट केले.
—————————————————–
हेही वाचा…
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल: 15 दिवसांपूर्वीही बिघडली होती प्रकृती, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सोडून तातडीने रुग्णालयात पोहोचल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक अर्धवट सोडली आणि तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी