![]()
ज्येष्ठ गीतकार, लेखक आणि विचारवंत जावेद अख्तर यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 2026 चा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 28 नोव्हेंबरला सकाळी 9.30 वाजता पुण्यातील समता भूमी, महात्मा फुले स्मारक (फुलेवाडा) येथे पुरस्कार दिला जाई
.
महात्मा फुले पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे. परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर आणि महिला शहराध्यक्ष वैष्णवी सातव यांनी ही माहिती दिली.
जावेद अख्तर यांनी साहित्य, चित्रपट आणि सामाजिक विचारविश्वात योगदान दिले आहे. १९७० च्या दशकात त्यांनी सलीम खान यांच्यासोबत ‘सलीम-जावेद’ ही पटकथालेखकांची जोडी तयार केली.
‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘त्रिशूल’ आणि ‘डॉन’ या चित्रपटांतून त्यांनी सामान्य माणसाचा संघर्ष आणि अन्यायाविरुद्धचा आवाज मांडला. त्यांनी अनेक लोकप्रिय गीतेही लिहिली आहेत.
चित्रपट क्षेत्राबाहेर धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली आहे. साहित्य आणि कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण यांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
फुले-आंबेडकरी समतेच्या विचारांशी सुसंगत सामाजिक भूमिका आणि विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेऊन अख्तर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी शरद पवार, शरद यादव, भूपेश बघेल, अरुंधती रॉय, बाबा आढाव, डॉ. भालचंद्र नेमाडे, प्रा. रावसाहेब कसबे आणि नागराज मंजुळे यांच्यासह अनेकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.