![]()
मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीत झालेल्या मांसाहारी पार्टी प्रकरणात मुख्याधिकारी पराग वानखडे यांची चौकशी सुरू आहे. तीन अधिकाऱ्यांची समिती एक-दोन दिवसांत अधिकृत बैठक घेणार असून आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे.
.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 18 नोव्हेंबरला समिती नेमली. समितीला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीत अहवाल देणार असल्याचे समितीच्या प्रमुख आणि सदस्य सचिवांनी सांगितले.
समितीच्या अध्यक्ष नगरपरिषद प्रशासनाच्या जिल्हा सहआयुक्त आणि चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे आहेत. अचलपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड सदस्य सचिव आहेत. कर आणि प्रशासकीय अधिकारी चेतन ढेवले समितीचे सदस्य आहेत.
पराग वानखडे यांनी 13 नोव्हेंबरला नगरपरिषदेच्या इमारतीच्या गच्चीवर मांसाहारी पार्टी ठेवली होती. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी त्यात सहभागी झाले होते. भाजपचे नगरसेवक आणि काही नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे तक्रार केली.
मोर्शी-वरूडचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांनीही वानखडे यांच्या निलंबनाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी 14 नोव्हेंबरला वानखडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून 16 नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले होते.
उत्तर असमाधानकारक आणि वस्तुस्थितीशी जुळणारे नसल्याचे सांगत वानखडे यांना निलंबित करण्याची भूमिका घेण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी टवलारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
पार्टीचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्यामुळे हे प्रकरण समोर आले. त्यानंतर काही नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. घटनेचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला नगरसेवक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.