![]()
अमरावती जिल्ह्यातील सुमारे 5 हजार प्राथमिक शिक्षक 1 डिसेंबरपासून अशैक्षणिक ऑनलाइन कामे करणार नाहीत. तसेच ते प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत. सर्व शिक्षक संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.
.
पुण्यातील शिक्षक भवनात झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक संघटनांच्या बैठकीत यावर एकमत झाले. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील शिक्षक या आंदोलनात सहभागी होतील, असा संघटनांचा दावा आहे.
ऑनलाइन अशैक्षणिक कामांचा वाढता भार, प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणत्याही वेळी येणारे संदेश आणि आदेश, तसेच शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. ऑनलाइन कामांमुळे विद्यार्थ्यांच्या रोजच्या शिकवण्यावर परिणाम होत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. कामांची वाढती यादी पाहता मुख्याध्यापक आणि शिक्षक त्रस्त असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संचमान्यता धोरणाचे परिणाम, टीईटीबाबत शासनाची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणारी धोरणे आणि शाळांच्या अडचणी हेही बैठकीत मांडण्यात आले. शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रश्नांवर शिक्षक संघटनांनी यापूर्वी आंदोलने केली, निवेदने दिली आणि चर्चेतून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय झाला नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे ठरवले.
अशैक्षणिक कामे न देण्याचा शासनाचा निर्णय असतानाही अनेक जिल्ह्यांत शिक्षकांना वेगवेगळी कामे दिली जात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या!’ या घोषवाक्याखाली संघटना एकत्रित लढा देणार आहेत. पुढील काळात कृती कार्यक्रम आखून सामाजिक, विद्यार्थी आणि पालक संघटनांनाही आंदोलनात सहभागी केले जाणार आहे.
आंदोलनात सहभागी संघटना: म.रा. प्राथमिक शिक्षक समिती, म. रा. प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, म.रा. प्राथमिक शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्राचे पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, म.रा. पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अ. भा. उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना.