Headlines

आकाशात तिरंगी रंगांची उधळण: सूर्यकिरणच्या थराराने सातारा मंत्रमुग्ध, नऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी अवकाश दणाणले


शहीद जवानांच्या शौर्याला सलाम, भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन आणि साताऱ्याच्या सैनिकी परंपरेचा गौरव… अशा देशभक्तिपूर्ण वातावरणात भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमने साताऱ्याच्या आकाशात थराराची अनुभूती दिली. नऊ लढाऊ विमानांनी सादर

.

आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक असून, त्यांच्यामध्ये देशसेवा आणि समाजसेवेची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांसह देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी या विशेष एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात प्रथमच साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या या हवाई प्रात्यक्षिकांना सैनिक स्कूलच्या फुटबॉल मैदानावर हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी गर्दी केली होती.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, भारतीय हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर एडवर्ड प्रिन्स, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅ. रामनाथन आदी उपस्थित होते.

खासदार भोसले म्हणाले, देशातील नागरिक सुरक्षित आणि निर्धास्त जीवन जगू शकतात, यामागे सीमेवर आणि देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या बलिदानाची जाणीव नव्या पिढीला झाली पाहिजे. या एअर शोमधून विद्यार्थ्यांना हवाई दलातील करिअरच्या संधी समजतील आणि त्यांच्यात देशसेवेची प्रेरणा निर्माण होईल.

सूर्यकिरण टीमच्या नऊ विमानांनी जमिनीपासून एक हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून विविध हवाई कसरती सादर केल्या. विमानांची एकमेकांना छेद देणारी उड्डाणे, वेगवान वळणे आणि अचूक समन्वयाने सादर केलेली प्रात्यक्षिके पाहताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विमानांतून सोडण्यात आलेल्या तिरंगी धुराने आकाशात रंगांची उधळण केली, तर हार्ट शेपच्या प्रात्यक्षिकाने विशेष आकर्षण निर्माण केले.

शहरातील उंच इमारती, चार भिंती परिसर आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरूनही नागरिकांनी या हवाई कसरती पाहण्यासाठी गर्दी केली होती. संविधान दिनाचे औचित्य साधून उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. देशभक्ती, शौर्य, संविधानिक मूल्ये आणि हवाई दलाचे सामर्थ्य यांचा संगम घडविणारा हा एअर शो साताऱ्याच्या स्मरणात राहणारा ठरला.

साताऱ्याच्या आकाशात देशभक्तीचा त्रिवेणी संगम

– भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमची नऊ विमानांतून प्रात्यक्षिके. – एक हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून चित्तथरारक उड्डाणे. – तिरंगी धुरातून आकाशात रंगांची उधळण. – हार्ट शेपच्या प्रात्यक्षिकाला नागरिकांची विशेष दाद. – हजारो विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती. – 26/11 च्या शहीदांना अनोख्या पद्धतीने अभिवादन. – संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन. – महाराष्ट्रात प्रथमच साताऱ्यात सूर्यकिरण एअर शोचे आयोजन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *