केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या आणि संभाव्य डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी ‘व
.
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, यामध्ये डिलिमिटेशन विधेयक सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. व्हीपमध्ये म्हटलंय की, सर्व खासदारांनी अधिवेशन काळात सभागृहात प्रत्यक्ष हजर राहून पक्षाच्या भूमिकेनुसार मतदान करणे किंवा कामकाजात सहभागी होणे आवश्यक असून पक्ष घेईल त्या निर्णयाला पाठिंबा द्यावा.
बिल पाहिले नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेचे विशेष अधिवेशन होत असले तरी त्याचा नेमका अजेंडा काय आहे, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. अधिवेशन असल्याने प्रत्येक पक्ष आपल्या खासदारांसाठी व्हीप काढत असतो. डिलिमिटेशन विधेयक अद्याप पाहिले नसल्यामुळे त्यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत अनेक मुद्द्यांवर रोज चर्चा होत असते. संजय राऊत हे देशाचे आणि राज्याचे मोठे नेते असून ते आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही सुळे म्हणाल्या. तसेच, पहलगाम हल्ल्याच्या वेळी शरद पवार यांनी सर्वात आधी ‘आम्ही देशासोबत आहोत,’ अशी भूमिका घेतली होती आणि त्यानंतर इंडिया आघाडीनेही तीच भूमिका मांडली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. पक्षांतर्गत बदलांबाबत बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने इतरांना संधी देण्यात आली असून, युवक आणि महिला आघाडीत कार्यकाळ पूर्ण झाल्यावर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पक्षाची जुनी पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे विधेयक लोकशाहीवर थेट आघात करणारे- आव्हाड
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून नताशा आव्हाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे हे चुकीचे, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असल्याने आगामी निवडणुकांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची संधी भाजपकडे होती.

मात्र, आता भाजप पुन्हा एकदा महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मनमानी पद्धतीने आणण्यात येत असलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. हे विधेयक लोकशाहीवर थेट आघात करणारे असून, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. त्यांची सरमिसळ केल्यास भाजपच्या राजकीय डावपेचांना आपणच बळी पडू, असा इशाराही नताशा आव्हाड यांनी दिला आहे.
हे ही वृत्त वाचा
डिलिमिटेशन विधेयक मंजूर व्हावे, असे राऊतांच्याही मनात:विदर्भ-महाराष्ट्रातील खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने- चंद्रशेखर बावनकुळे

डिलिमिटेशन विधेयक मंजूर व्हावे, असे संजय राऊत यांच्याही मनात आहे; मात्र त्यांना बोलताना केवळ विरोध करावा लागत आहे. डिलिमिटेशनमुळे विकास साधण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी छोटे मतदारसंघ आवश्यक आहेत, याची जाणीव त्यांनाही आहे. तरीही विरोध करण्याचा अजेंडा असल्याने ते या विधेयकाला विरोध करत आहेत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर