![]()
शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर 2 दिवसांपूर्वी भरदिवसा घडलेला गोळीबार आणि कोयता हल्ल्याचा थरार ताजा असतानाच, शुक्रवारी (27 नोव्हेंबर 2026) पुण्यातील गजबजलेल्या 15 ऑगस्ट चौकात एक बेवारस आणि संशयित बॅग आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागर
.
नेमकी घटना काय? 15 ऑगस्ट चौकात पोलिसांची धावाधाव
पुणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक न्यायालये व महानगरपालिका इमारती बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे ई-मेल गेल्या काही दिवसांत प्राप्त झाल्याने संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आधीच ‘हाय अलर्ट’वर आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुण्यातील 15 ऑगस्ट चौकात एक संशयित बॅग बेवारस अवस्थेत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
बॉम्ब स्क्वॉड व डॉग स्कॉड दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉडने तातडीने 15 ऑगस्ट चौकात धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरातील वाहतूक व नागरिकांची वर्दळ रोखून संपूर्ण भाग मोकळा केला आहे. या बॅगमध्ये नेमके काय आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येऊ शकणार आहे.
धमकीच्या ई-मेल्सनंतर संशयित बॅग सापडण्याची पुण्यातील 3 री घटना
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक व प्रशासकीय वास्तू सातत्याने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत. यापूर्वी पुणे महानगरपालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आला होता; त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयालाही 2 वेळा असेच धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने पोलिसांनी संपूर्ण कोर्ट परिसराची कसून तपासणी केली होती. धमकीच्या या सत्रानंतर आता थेट 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळून आल्याची ही 3 री मोठी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच घडली घटना
अवघ्या 2 दिवसांपूर्वी (25 नोव्हेंबर 2026) पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे या तरुणावर गोळीबार करून कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. या घटनेनंतर राज्यभरातून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र टीका होत आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क करण्यासाठी आजच पुण्यात उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला आणि शहरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर या बैठकीत सखोल चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.