हिंगोली येथे जिल्हास्तरीय गुंतवणुक परिषदेत शुक्रवारी (ता. 27) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 101 उद्योजकासोबत 1235 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. त्यातून सात हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. या शिवाय कळमनुरी ता
.
हिंगोली येथील शांती हॉटेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत झाली. यावेळी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त स्वप्नील राठोड, उद्योजक अनिल नेनवाणी, ज्ञानेश्वर मामडे उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी मार्गदर्शन केले.
राज्यात उद्योग उभारणी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. दावोस येथे दरवर्षी मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करार केले जातात. त्याच धर्तीवर जिल्हास्तरावर गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात आज झालेल्या 101 गुंतवणूक करारांतून सात हजार पेक्षा जास्त रोजगारनिर्मिती अपेक्षित असून, गाव तेथे उद्योजक तयार करण्यासाठी शासन-प्रशासन संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

हळदीचे क्लस्टर उभारणार
वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादन, प्रक्रिया व मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे. परिसरातील तीन जिल्ह्यांमधून सुमारे 25 लाख टन हळदीचे उत्पादन होत असल्याने त्यामुळे भविष्यात 100 कोटीचा हळदीवर प्रक्रीया करणारा फार मोठा उद्योग क्लस्टरच्या रुपाने उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
हिंगोलीत कौशल्य विकास केंद्राची लवकरच उभारणी
जिल्ह्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी लवकरच कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हिंगोलीतील उद्योजकांना उद्योगविषयक कामांसाठी मुंबई येथे जाण्याची आवश्यकता भासल्यास त्यांना प्रोत्साहन व सहकार्य करण्यात येईल. शासन उद्योजकांच्या पाठीशी असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचेही सामंत यांनी सांगितले.