छत्रपती संभाजीनगरमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी आगामी तीन वर्षांत यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रताप भोसले यांनी केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल ब्राह्मण युवक-युवतींना स्वयंरोजगार आणि उद्य
.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर झाले. त्यावेळी भोसले बोलत होते.
शिबिराला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी उदय लोकापल्ली, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी भारती सोसे-पांढरकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम खरात उपस्थित होते. अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा व्यवस्थापक हर्षा बकाल, बँकेचे प्रतिनिधी पराग जोशी आणि कर्ज अधिकारी संतोष गजवारे यांचाही सहभाग होता.
अजिंठा-वेरूळ पर्यटनस्थळांमुळे जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात संधी आहेत, असे भोसले म्हणाले. पर्यटन मार्गदर्शन, खानावळ आणि भोजनव्यवस्था, तसेच जपानीसह अन्य परदेशी भाषांचे प्रशिक्षण या क्षेत्रांत कमी भांडवलात स्वयंरोजगार सुरू करता येऊ शकतो.
या व्यवसायांसाठी बँका आणि महामंडळाने तरुणांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. महामंडळ थेट कर्ज देत नाही; बँकेकडून घेतलेल्या पात्र कर्जावरील व्याजाचा परतावा देते. लघुउद्योजकांना दीड ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्याबाबत बँकांनी सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली.
उदय लोकापल्ली यांनी वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनांची माहिती दिली. वैयक्तिक योजनेत पात्र लाभार्थ्यांना १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कमाल साडेचार लाख रुपये व्याज परतावा मिळतो.
गट योजनेत सदस्यसंख्येनुसार 25 ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कमाल 7 लाख 50 हजार ते 15 लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. अर्जदारांचे वय 18 ते 45 वर्षे आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.
उद्योग प्रत्यक्ष सुरू असल्याची पडताळणी करण्यासाठी जीपीएस मार्किंगसह छायाचित्रे देणे बंधनकारक आहे. या योजना स्वयंरोजगारासाठी आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा लाभ घेता येणार नाही, असे लोकापल्ली यांनी सांगितले.
महामंडळाचे जिल्हास्तरीय मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जिल्हास्तरीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्राचे काम सुरू करण्याची प्रक्रिया चालू आहे.
शिबिराला ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी सचिन वाडेपाटील, सुरेश मुळे, मोरेश्वर मार्गीकर, विजय शेकदार आणि योगेश धर्माधिकारी उपस्थित होते. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी, बँक प्रतिनिधी, उद्योजक, लाभार्थी आणि पालकही सहभागी झाले.


