![]()
पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या वाड्यात कार्यक्रम झाला. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फुले यांना अभिवादन केले. महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाल
.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही समाजाला दिशा देतात, असे गोऱ्हे म्हणाल्या. शिक्षणासोबत शेतकरी, कामगार, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना महत्त्व देण्याची शिकवण त्यांच्या कार्यातून मिळते. फुले दाम्पत्याचे विचार समाजापर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रे काढली. काही विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याची वेशभूषा करून त्यांच्या कार्याचा संदेश दिला. फुले यांच्या विचारांवर साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आले.
वास्तूंच्या विकासाबाबत बोलताना गोऱ्हे यांनी भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणे आणि दोन्ही वास्तूंचा विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक रहिवाशांना न्याय मिळेल, असा तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी मावळ परिसरात आठ दिवसांत ८० ते ९० किलोमीटर पदयात्रा केल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमात उपस्थित पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचे स्वागत करून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुरस्कारप्राप्त तिन्ही मान्यवरांनी पुरस्काराच्या अपेक्षेपेक्षा समाजकार्याला प्राधान्य देत आयुष्यभर योगदान दिले, असे गोऱ्हे म्हणाल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी ६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा विषय सभागृहात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर, शिवसेना राष्ट्रीय युवाध्यक्ष किरण साळी, युवासेना सचिव तथा महात्मा फुले वाडा शिवसेना समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, ग्रामीण युवासेनेचे नीलेश घारे, एकनाथ ढोले, संदीप शिंदे आणि मीनल धनवटे उपस्थित होते. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पालकही कार्यक्रमाला उपस्थित होते.