Headlines

नरेश म्हस्के म्हणाले- संजय राऊतांची राहुल-सोनियांना खुश करण्यासाठी पवारांवर टीका: पवार साहेबांवर टीका करण्याचा अधिकार काय? म्हस्केंचा वडेट्टीवारांवरही पलटवार – Naresh Mhaske Attacks Vijay Wadettiwar Over Sharad Pawar Criticism



केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना रोखठोक भूमिका मांडली.

.

“2023 मधील 106 व्या घटनादुरुस्तीनुसार मंजूर झालेल्या ‘नारीशक्ती वंदन’ कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विधि व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रस्ताव क्रमांक 158 आणि 159 मांडले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाच्या पाठीशी एकमताने आणि ठामपणे उभे राहणार आहेत,” असे म्हस्के यांनी स्पष्ट केले. तसेच, या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांचे स्वागत करतानाच, त्यांनी शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेतला.

“संजय राऊत यांची राज्यसभेची मुदत आता संपत आली असून उबाठा गटाच्या जीवावर ते पुन्हा खासदार होऊ शकत नाहीत; त्यामुळे ‘नटसम्राट’ नाटकातील ‘मला कोणी घर देता का घर’ या संवादाप्रमाणे त्यांची ‘मला कोणी खासदार करता का’ अशी केविलवाणी धडपड सुरू आहे,” असा घणाघाती टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार!

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि ‘विकसित भारत 2047’ चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलले असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. 2023 च्या 106 व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना एक तृतीयांश (33 टक्के) आरक्षण देण्याच्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचे (50 टक्के जागा वाढवणे) प्रस्ताव क्रमांक 158 आणि 159 संसदेत आणले गेले आहेत. या वाढणाऱ्या महिलांच्या जागांमध्येही एक तृतीयांश जागा या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असणार आहेत, ज्यामुळे तळागाळातील समाजाला मोठे प्रतिनिधित्व मिळेल.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली

आज महात्मा जोतिराव फुले यांचा स्मृतिदिन आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांच्या प्रतिमेला केवळ पुष्पहार अर्पण न करता त्यांचे विचार खऱ्या अर्थाने अमलात आणणारा हा निर्णय आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले असून, या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राऊतांचा अजेंडा महाराष्ट्राचा नाही तर स्वतःच्या राज्यसभेचा

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांची नरेश म्हस्के यांनी जोरदार खिल्ली उडवली. संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत, यामागे त्यांना महिला आरक्षणाशी काहीही देणेघेणे नाही. राऊत यांची राज्यसभेची टर्म आता संपत आली आहे आणि उबाठा गटाच्या सध्याच्या संख्याबळावर ते पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसला खूश करण्यासाठी (खुशमस्करी) आणि त्यांच्या मदतीने पुन्हा राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांची ही सगळी धडपड सुरू आहे.

‘नटसम्राट’ नाटकाचा दाखला देत टोला

राऊत यांचा अजेंडा महाराष्ट्र किंवा पक्षाचा नसून ‘फक्त मला खासदार करा’ हाच आहे. मराठीतील प्रसिद्ध ‘नटसम्राट’ नाटकात जसे “मला कोणी घर देता का घर” असे म्हटले जाते, तशीच “मला कोणी खासदार करता का” अशी अवस्था आज संजय राऊतांची झाली आहे.

शरद पवारांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो

देशाच्या विकासात आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे या दृष्टीने शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल, तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली असली तरी त्यांना पवार साहेबांवर बोलण्याचा काय अधिकार आहे? राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांना योग्य ते उत्तर देतील; मात्र वडेट्टीवार यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता मी त्यावर न बोललेलेच बरे.

महिलांच्या सन्मानासाठी पाठिंबा द्या

आजवर अनेक पक्षांनी महिला आरक्षण आणि एससी-एसटी महिलांच्या हक्कांवरून केवळ राजकारण केले; पण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली, तेव्हा पराभवाच्या भीतीने ते मागे हटून विरोध करत आहेत. माझी सर्व विरोधकांना विनंती आहे की, त्यांनी राजकारण बाजूला ठेवून महिलांच्या आत्मसन्मानासाठी या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही खासदार नरेश म्हस्के यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *