![]()
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आडनदी-कामापूर येथे प्रस्तावित उदंचन जलविद्युत प्रकल्पाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली. शुक्रवारी त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती घेतली आणि आवश्यक निर्देश दि
.
या प्रकल्पामुळे आदिवासींच्या जमिनी, जैवविविधता आणि पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका वानखडे यांनी मांडली. विकासाच्या नावाखाली आदिवासींचे जीवन आणि उपजीविका उद्ध्वस्त होऊ नये, याची जबाबदारी शासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.
वानखडे यांच्या माहितीनुसार, संबंधित कंपनीला २८ नोव्हेंबर २०२५ आणि २ मार्च २०२६ रोजीच्या पत्रांद्वारे वनखंड क्रमांक ६, ७, ८, १२, १३, १४ आणि १५ मध्ये नकाशा मोजणीची परवानगी देण्यात आली. तसेच वनखंड क्रमांक १२, १३ आणि १४ मधील ३.४६७ चौरस किलोमीटर क्षेत्रात ५४.७ ते ७५.७ मिलिमीटर व्यासाचे २४ बोअरहोल करण्याची परवानगी दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करावा आणि भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व वन संवर्धन अधिनियम १९८० मधील नियमांचे पालन झाले आहे का, हे तपासावे, अशी मागणी वानखडे यांनी केली. अटींचे उल्लंघन आढळल्यास परवानगी रद्द करून नियमानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
सर्वेक्षणासाठी खोदलेले खड्डे बुजवून जंगल पूर्ववत केले आहे का, याची जिओ-टॅग छायाचित्रांसह चौकशी करून अहवाल द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. वन्यजीवांचे अधिवास आणि भ्रमणमार्ग, स्थानिक जलस्रोत, जैवविविधता, जमिनीची धूप आणि सूक्ष्म हवामानावर होणाऱ्या परिणामांची तपासणी करण्यासही त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष वृक्षगणना, वनक्षेत्राचे प्रमाणित नकाशे आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास सादर करून वन विभागाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे वानखडे म्हणाले. बैठकीला मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक के. अर्जुना आणि योगेश तपस, पाटील व भांड हे अधिकारी उपस्थित होते.
वानखडे यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या संवैधानिक मंजुरी, सर्वेक्षणाच्या अटींचे कथित उल्लंघन, वृक्षतोड, वन्यजीवांचे अधिवास, आदिवासींचे वनहक्क, ग्रामसभांची संमती आणि स्थानिक जलस्रोतांवरील संभाव्य परिणामांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आदिवासींच्या जल-जंगल-जमिनीच्या हक्कांशी तडजोड स्वीकारणार नाही, असेही त्यांनी म्हटले.