![]()
म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफी व्यावसायिकाला लक्ष्य करून भररस्त्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन तोळे सोन्याचे दाग
.
म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवापूर ते पळसावडे मार्गावर ही घटना घडली होती. पळसावडे येथील सराफी व्यावसायिक नवनाथ वसंत खुपकर हे दुचाकीवरून जात असताना निर्जन ठिकाणी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना जखमी करून तलवारीचा धाक दाखवला. दमदाटी करीत त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग हिसकावून घेत आरोपी सांगली जिल्ह्याच्या दिशेने पसार झाले होते. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे, गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींच्या पळून जाण्याच्या मार्गाचा अभ्यास केला. सातारा, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली. गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांत संशयितांची नावे निष्पन्न करण्यात आली.
संशयित आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून, गुन्ह्यानंतर ते गावातून गायब झाले होते. पोलिसांची पथके वेषांतर करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. धुळदेव-पिलीव घाट परिसरात संशयित येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या गुन्ह्यात आणखी साथीदारांचा सहभाग असल्याचे समोर आले.
तपासात देवापूर येथील सुनिल मारुती मंडले याने सराफी व्यावसायिकाच्या हालचालींवर पाळत ठेवून लुटीचा कट आखल्याचे निष्पन्न झाले. त्याने सोलापूर जिल्ह्यातील साथीदारांना बोलावून घेतले होते. तसेच मुख्य आरोपींना गुन्ह्यानंतर आश्रय देऊन लपवून ठेवण्यातही मदत केल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये अजय सत्यवान शिरतोडे, शुभम दुर्योधन बोडरे (दोघेही रा. वाकी-शिवणे, ता. सांगोला), रोहित दादासाहेब जाधव (रा. महूद, ता. सांगोला) आणि सुनिल मारुती मंडले (रा. देवापूर, ता. माण) यांचा समावेश आहे. आरोपींकडून लुटलेले सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिस पथकाचे अभिनंदन
या गुन्ह्याची जलद उकल करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले. पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.