Headlines

परिसिमन विधेयक म्हणजे निव्वळ फ्रॉड: मी देखील पाठिंबा देऊ शकलो असतो पण मी महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचा विचार करतो- उद्धव ठाकरे – Uddhav Thackeray Opposes Delimitation Bill



लोकसभेत उद्या मांडल्या जाणाऱ्या परिसिमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे निव्वळ ‘फ्रॉड’ असून, मतचोरीचा आरोप असलेले ज्ञानेश कुमार आणि भाजपच्या मर्जीतील लो

.

उद्धव ठाकरे म्हणाले, उद्या जे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे, दुर्दैवाने त्याचा त्रास संपूर्ण देशाला होणार आहे. मलाही त्या विधेयकाला पाठिंबा दिला असता, पण मी पक्षाच्या हितापेक्षा महाराष्ट्राचे हित आणि देशाच्या हिताचा जास्त विचार करतो आणि तो विचार केल्यानंतर काही गोष्टी ज्या लक्षात आल्या ती कारणं शिवसेनेच्या भूमिकेमागची आहेत. शिवसेनेने ही भूमिका का घेतली, तर पहिले कारण म्हणजे हे परिसिमन किंवा हे सगळे ठरवण्याचा अधिकार ज्यांना दिला आहे, ज्यांच्यावर मतचोरीचा आरोप झालेला आहे आणि तो तसा जनतेत बऱ्यापैकी सिद्धही झालेला आहे. त्यांना हटवण्याची मागणी देखील देशभरातून होत आहे, तरी देखील मतचोरी ज्यांनी केली त्याच ज्ञानेश कुमार यांना समितीवर ठेवण्यात आले आहे. अजून एक सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असणार आहेत, हे निवडण्याचा अधिकार कोणाचा, तर मोदी आणि अमित शहा यांचा. या निवडलेल्या व्यक्ती सगळ्या त्यांच्याच असणार आहेत. ही समिती हा एक फार्स आहे आणि जे काही करायचे आहे ते भाजपकडे सगळी स्क्रिप्ट तयार आहे.

ही पद्धतच फ्रॉड; उघडपणे मतचोरीचा डाव

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही पद्धतच फ्रॉड आहे. निवृत्त न्यायाधीश घेतले म्हणजे आमचे समाधान नाही. ते कोण असणार आहेत? शंभर टक्के हे त्यांचेच कोणीतरी असणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे परिसिमन जे होईल, त्यात सव्वा पाचशे लोकसभेची स्ट्रेन्थ आहे. राज्यसभेच्या जागा वाढणार आहेत का? याचे काही समोर आलेले नाही. हे परिसिमन सुद्धा ही समिती करणार आणि कशी करणार याचा चांगला अनुभव आम्ही 2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस घेतला आहे. आताच्या महापालिका निवडणुकीतही त्यांनी तेच केले आहे. कोणती यादी कोणत्या पक्षाला जास्त मतदान करणार याचा त्यांनी अभ्यास केला आहे. काही मतदारसंघ असे बनवले जातील, त्यात त्यांचेच मतदार असतील. त्यात विरोधकांचाही एखादा मतदारसंघ ते तयार करू शकतात. निवडणूक आयुक्तांना सांगायला जावे तर ते वरती बोट दाखवणार. हा उघडपणे मतचोरीचाच विषय हे मांडणार आहेत.

अख्खा महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होणार

तामिळनाडूच्या 39 जागा आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये हा जो आकडा वाढल्यानंतर महाराष्ट्राच्या 48 च्या 72 जागा होणार, बरोबर आहे. म्हणजे 72 जागा… आताच्या 48 जागा असताना उत्तर प्रदेशमध्ये आणि आपल्यामध्ये 32 जागांचा फरक आहे, बरोबर आहे? आपले 50 टक्के वाढल्यानंतर आणि उत्तर प्रदेशचे 50 टक्के वाढल्यानंतर हा जो 32 जागांचा फरक आहे, तो 48 जागांचा होणार आहे, हे कोणाच्या लक्षात आलंय का? म्हणजे अख्खा महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशमध्ये वाढतोय. म्हणजे 48 जागांची जी आज किंमत आहे, ती अख्खीच्या अख्खी उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

स्टॅलिन आणि तामिळनाडूच्या जनतेला इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले, तसंच तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधला जो जागांचा फरक आज 41 आहे. आता खास करून मी स्टॅलिनला (सांगतो), थोडंसं पाहता मराठीचं ट्रान्सलेशन करून त्यांनी घ्यावं आणि त्यांच्याकडे जर कोणी माझी प्रेस कॉन्फरन्स बघत असतील तर द्रमुकला आणि तामिळनाडूच्या जनतेला त्यांनी सांगावं की, आज उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधला जो फरक आहे तो 41 चा आहे, तो उद्या 61 होईल. म्हणजे 20 जागा त्यांच्या अधिक होणार आहेत. याचा अर्थ तामिळनाडूच्या जागा वाढल्यासारख्या जरी वाटल्या, तरी देखील हा जो फरक आहे हा वाढणार आहे. हा केवळ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यातला हा फरक आहे. बाकी उत्तरेतली जी राज्यं आहेत, त्यांच्यामधला जर का फरक काढला तर तो कितीतरी पटीने वाढेल.

महाराष्ट्राकडून कर वसूल करता आणि गळाही दाबता

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्याचा दुष्परिणाम असा होईल की जी काही दक्षिण… म्हणजे आता महाराष्ट्र हे असं मला वाटतं, आताच्या यांच्या कारभारावरून नक्की आकडा मला माहिती नाहीये, पण देशातल्या सर्वात अधिक कर देणाऱ्या राज्यांमधलं महाराष्ट्र एक राज्य आहे. मग महाराष्ट्राचा आवाज… एक तर त्या कराचा परतावा महाराष्ट्राला त्या टक्क्यात मिळत नाही, ही आमची मागणी पहिल्यापासून आहे की महाराष्ट्र जेवढ्या पटीने तुम्हाला जेवढा टॅक्स देतो, त्याचा परतावा महाराष्ट्राच्या विकासासाठी किती मिळतो? आणि तो जर बाकीच्या राज्यांवर जात असेल, जाऊ द्या. पण मग महाराष्ट्राच्या आवाजाचं काय? महाराष्ट्राचा म्हणजे तुम्ही गळा दाबताय. एक तर तुम्ही आमच्याकडून कर वसूल करता आहात, गळाही दाबताय आणि याच्यामध्ये कसलं देशहित येतंय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपची फसवणूक

आणखीन एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की, याला महिला विधेयक जे जोडलेलं आहे, महिला विधेयक याच्यात आणू नका. कारण महिला विधेयक हे मंजूर झालेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. महिला विधेयक परत आणण्याची गरज नाहीये. पण केवळ महिला विधेयक वेगळं करून आणलं तर मी आता महिला विधेयकाला पाठिंबा देतो. आणि मग त्याच्यात देखील आता आमची मागणी काय, की किती टक्के तुम्ही महिलांना आरक्षण देताय? 33%, बरोबर ना? मग 534 मध्ये 33% किती होतात आणि 850 मध्ये 33% किती होतात? म्हणजे ही भाजप फसवणूक करते देशाची, महिलांची. आमचं म्हणणं असं आहे की आता जो काही आकडा आहे, 534 असेल, 550 असेल, काय असेल तो, त्याच्यामध्ये 33% तुम्ही द्या. तर 850 करणार आणि त्याच्यात तुम्ही 33% देणार, म्हणजे तुम्ही फसवताय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आता तुम्ही खोके बघताय, उद्या कचऱ्याच्या पेटीत जाल

उद्धव ठाकरे म्हणाले, महिलांच्या नावाखाली तुम्ही तुमचं घाणेरडं, नीच राजकारण याच्यामध्ये साधू पाहताय. म्हणून मी महाराष्ट्रातल्या सुद्धा सर्व खासदारांना आणि इतर देशातल्या सर्व खासदारांना हे सांगतो की तुम्ही स्वतःचं हित बघू नका. आता तुम्ही खोके बघताय, उद्या कचऱ्याच्या पेटीत जाल. म्हणजे आता तुमच्याकडे कदाचित खोका येईल, पण उद्या तुमच्या नशिबी कचऱ्याची पेटी येईल. तर त्याच्यामुळे कचऱ्याच्या पेटीत जायचं नसेल तर आता देशहिताचा विचार करून या गोष्टीला तुम्ही विरोध करावा, अशी माझी विनंती आहे. आम्ही शिवसेनेचे जे नऊ खासदार आहेत, त्या नऊ खासदारांना पक्षादेश दिलेला आहे. मतदान कसं करायचं, काय करायचं याही बाबतीत आमच्या नऊ खासदारांना आम्ही पक्षादेश दिलेला आहे, देणार आहोत. त्याच्याप्रमाणे ते मतदान करतीलच.

मुंबई महापालिकेच्या सीमांकनावरून सरकारवर निशाणा

पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की साधारणतः त्यांचं एक हे काय आहे की जागा वाढ केल्या पाहिजेत, ठीक आहे, बरोबर आहे. मग तसा जर का आपण मुंबई महापालिकेचा विचार केला तर मुंबई महापालिकेत अगदी सुरुवातीला किती जागा होत्या? 121 का काहीतरी होत्या, नाही… 170. मग 170 आणि आता 227 आहेत. आता लोकसंख्या वाढते, पण लोकसंख्या वाढल्यानंतर त्या प्रमाणात लोकप्रतिनिधी वाढले पाहिजेत ते बरोबर आहे. आम्ही 227 चे 266 केले होते. पण यांनी ते… म्हणजे निवडणूक आयोगाने पण त्याला मला वाटतं मान्यता दिली होती, कोर्टात पण मंजूर झालं होतं. यांनी सरकार पाडलं, ते पुसून टाकलं आणि परत 2017 च्या जागावाटप वाढीनुसार, सीमांकनानुसार ती निवडणूक घेतली, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

२०१७ च्या मुंबई मनपा निवडणुकीत झाली रंगीत तालीम

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आता खरी गोम हे आमच्या लक्षात कधी आलं? म्हणजे २०१७ मध्ये आणि तुम्ही वेळेवरती आलात बरोबर. २०१७ मध्ये त्यांनी जे डिलिमिटेशन केलं मुंबईच्या महानगरपालिकेचं, त्याच्यात काय झालं? हे जे मी मगाशी सांगितलं लोकसभेमध्ये कसे फोडले जातील वॉर्ड, त्याचं उदाहरण, त्याची रंगीत तालीम ही २०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत झालेली आहे. त्यांनी केलं आणि ती यशस्वी झाली. ती कशी झाली अनिल परब तुम्हाला व्यवस्थित सांगतील मतदारसंघ कोणते होते. मुंबई महापालिकेत आमचे दोन बाजूबाजूचे वॉर्ड हे १०० टक्के निवडून यायचे. १०० टक्के आणि गेले अनेक वर्षं ते निवडून यायचे. आमच्या लक्षातच आलं नाही कारण युती होती ना आमची. यांनी कसा तोडला वॉर्ड? की जी शिवसेनेला सातत्याने मतदान करणारी जी यादी होती, याद्या होत्या त्या या वॉर्डातून उचलून आमच्या दुसऱ्या वॉर्डात टाकल्या आणि त्यांना ज्या दाद देणाऱ्या याद्या होत्या त्या त्यांनी आमच्या दुसऱ्या वॉर्डात टाकल्या. त्याचं पर्यवसान काय झालं? दोनपैकी आम्ही एक जागा जिंकलो. एक जागा ही आधीपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकलो, पण दुसरी जागा जी आमची हमखास यायची ती हरलो. आता तसंच हे विरोधी पक्षाचे मतं जातीनुसार असतील, धर्मानुसार असतील किंवा राजकारणानुसार असतील, हे मतदार हे कापणार आणि उघड उघड हे यांचे वॉर्ड फॉर्म करणार. आणि त्याच्यामध्ये सर्वात जो तज्ज्ञ आहे चापलूसी करणारा, ज्ञानेश कुमार हा यांचा म्होरक्या आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती कसा विश्वास ठेवणार? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

खासदार वाढवण्यापेक्षा विकास निधी आणि टीम वाढवा

बरं, मी जे तुम्हाला सांगत होतो की लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधी वाढले पाहिजेत, मान्य आहे. त्यांचा आर्ग्युमेंट काय आहे की काही वॉर्ड २६ लाखांचे आहेत, त्या २६ लाखांना एक खासदार कसा काय पुरा पडणार? ठीक आहे, बरोबर आहे. पण जर का आपण लोकप्रतिनिधी कोणत्या सभागृहाचे आहेत आणि कोणत्या सभागृहाचं काय काम आहे, याची निश्चित केलेली कामं ते-ते लोकप्रतिनिधी करतील तर मला असं वाटतं हा प्रश्न सुटेल. म्हणजे उदाहरणार्थ जे आदित्य मागे सातत्याने सांगत होता आणि सांगतो की ‘वॉटर, मीटर, गटर’ हे काम खासदाराचं नाहीये. त्याच्यासाठी नगरसेवक आहे. राज्यासाठी जे काही विषय आहेत ते विधानसभेचे आहेत आणि राज्याचे विषय लोकसभेत मांडायचे आहेत ते खासदाराचे आहेत. त्याच्यामुळे ही तुम्ही मांडणी करा, खासदाराची टीम वाढवून द्या. खासदाराचा विकास निधी जो आहे तो ५ कोटींवरून १० कोटी करा. पण आता तुम्ही एकदम साडेआठशे खासदार वाढवल्यानंतर याचा खर्च किती वाढणार? तो कोणाला झेपणार आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

उद्या १५० कोटींच्या लोकसंख्येसाठी पंतप्रधानही वाढवणार का?

बरं, त्याच्यानंतर आणखीन एक त्यांचा आर्ग्युमेंट मी असं टीव्हीवरती बघितलं की २६ लाख, २५ लाख लोकांना एक खासदार पुरा पडत नाही, मग मतदारांना खासदार दिसतच नाही. मग सगळेच्या सगळे खासदार हे लोकसभेच्या संसदेत हजर असतात का? हजेरी घ्या. जर ५५० मध्येच हजर राहणारे खासदार किती आणि गैरहजर राहणारे खासदार किती याचा जरी आतापर्यंतचं प्रपोर्शन काढलं, तरी मग काही लोकं अशी असू शकतील की जे लोकांनाही दिसत नाहीत आणि लोकसभेतही दिसत नाहीत. मग वाढलेले खासदार कसं काय करणार? आणि एक खासदार जसं २६ लाख मतदान किंवा १५ लाख… मुंबईमध्ये साधारणतः १५ लाखांची मतदान संख्या आहे. १५ लाख मतदारांना पुरेसा पडत नसेल आणि म्हणून खासदार वाढवा असं असेल, तर मग १५० कोटींच्या लोकसंख्येला हे उद्या म्हणतील पंतप्रधान वाढवा, चालतील का? तसंच झालं ना! एक पंतप्रधान १५० कोटींच्या जनतेला कसा काय पुरा पडेल? म्हणून पंतप्रधान वाढवण्याची मागणी करतील, पण तसं नाही होऊ शकत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सभागृह नियंत्रणात येत नाही, मग खासदार वाढवून काय करणार?

साडेपाचशेचं जे सभागृह आहे, त्याच्यामध्ये एका वेळेला एकच अध्यक्ष (असतात), तालिका जरी असली तरी ते आलटून-पालटून बसतात. एक अध्यक्ष साधारणतः ही जी आत्ताची लोकसभा आहे किंवा राज्यसभा आहे, ती जर आवाक्याच्या बाहेर गोंधळ गेला तर ते कंट्रोल करू शकत नाहीत, मग स्थगित करावी लागते. गेलं अधिवेशन तर स्थगितीमध्येच होऊन गेलं. गेलं अधिवेशन हे स्थगितीमध्येच होऊन गेलं कारण विरोधी पक्ष आक्रमकतेने जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेला ना पंतप्रधान सामोरे आले, ना गृहमंत्री सामोरे आले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *