![]()
भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडून लढवेल, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. परिणामी, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या राजकारणात मोठे फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशात नुकत्याच 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपने दमदार कामगिरी करत पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवले. भाजपच्या या विजयाची देशभर चर्चा होत असताना आता भाजपने महाराष्ट्रावर आपले लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला जात आहे. त्यातच काही ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बॅनर्सवर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी उपरोक्त दावा केला आहे. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे किंवा नाही हा त्यांच्या पक्षाचा व महायुतीचा प्रश्न आहे. बारामतीकरांनी अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे हे वाटणे सहाजिकच आहे. पण 2029 सालची निवडणूक भाजप स्वबळावर लढेल. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी बाजूला फेकलेली असेल, असे विनायक राऊत म्हणाले. संदेश पारकर यांच्यावर पाणी सोडले विनायक राऊत यांनी यावेळी आपल्या पक्षाने कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावर पाणी सोडल्याचेही स्पष्ट केले. संदेश पारकर यांनी कणकवलीची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची वाटचाल एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या दिशेने सुरू होती. पण आम्ही त्यांच्यावर पाणी सोडले, असे ते म्हणाले. बंगालनंतर भाजपचे महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित उल्लेखनीय बाब म्हणजे पश्चिम बंगालमधील विजयानंतर आता भाजपने महाराष्ट्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी भाजपने निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेवर भर देण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी भाजपने परवाच दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एसआयआरच्या मुद्यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेत भाजपने एसआयआरच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी एक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात नेत्यांकडून भाजप पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. पदाधिकारी प्रशिक्षणानंतर भाजप आपल्या लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण देणार आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्याने आमदार, खासदार व मंत्र्यांना एसआयआर मोहिमेसाठी प्रशिक्षित केले जाईल. अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी आमदार व खासदारांना मार्गदर्शन करतील. वाचा सविस्तर
Source link
भाजप 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना देणार धक्का:अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सांगितला प्लॅन