Headlines

विना नंबर प्लेटच्या हायवा दिंडोरीत सुसाट:अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे महसूल बुडाला‎




तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेक हायवा गाड्या चक्क विना नंबर प्लेट रस्त्यावर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील विविध भागांतून मुरूम आणि दगडांची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांच्या पुढील किंवा मागील बाजूस नंबर प्लेट नसल्याचे आढळून येत आहे. वाहनांची ओळख लपवून कारवाई टाळण्यासाठी जाणीवपूर्वक नंबर प्लेट काढल्या जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा वाहनांकडून अपघात झाल्यास संबंधित वाहनांचा शोध घेणे कठीण ठरणार आहे. अवजड हायवा वाहनांचा सुसाट वेग पादचारी आणि दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. या वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था होत असून, उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्याकाठच्या शेतीचे तसेच नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि विना नंबर प्लेटची वाहतूक उघडपणे सुरू असतानाही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित विभागाने विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवर कारवाई करावी, वाहने जप्त करावीत आणि संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *