- Marathi News
- National
- Dangerous Constructions In The Himalayas; Three Lakh Citizens At Risk…, Research Published In The Journal ‘Scientific’, Flood Warning
नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

हिमालयीन क्षेत्रात वेगाने होणाऱ्या बांधकामांमुळे किमान ३ लाख लोकांच्या जीवाला नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण झाला आहे. एका नवीन अभ्यासानुसार, उत्तर नेपाळ, आग्नेय तिबेटचे काही भाग आणि उत्तराखंडमधील एका क्षेत्रात २०१६ ते २०२३ दरम्यान धोकादायक भागांत ४५% बांधकामे वाढली आहेत. तर हिमनद्यांच्या तलावांमुळे येणाऱ्या महापुराचा धोका असलेल्या भागांत बांधकामाचा वेग जास्त राहिला. येथे ७ वर्षांत ७८% बांधकामे वाढली आहेत. हे संशोधन ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. प्रत्यक्ष धोक्याच्या छायेत राहणाऱ्या लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे हा अभ्यास ऑगस्ट महिन्यात नेपाळमध्ये आलेल्या महापुरापूर्वी केला होता. त्या आपत्तीत १,४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेपत्ता झाले होते. त्यानंतरही महापुराच्या घटना घडल्या आहेत. ११ ऑक्टोबर रोजी बुढी गंडकी नदीला आलेल्या महापुरात २०० घरांचे नुकसान झाले, ५ पूल वाहून गेले.
५० किलोमीटर खालील भागाला धोका
ब्रिटन, नेपाळ आणि भारतातील ९ संशोधकांनी हिमालयीन नद्यांच्या प्रवाहात नदीपात्रापासून सुमारे ५० किलोमीटर खालील परिसर आणि सुमारे १,३६० हिमनद्यांच्या तलावांच्या आसपासच्या बांधकामांचा अभ्यास केला. या भागात पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांची कामे आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय वेगाने पसरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उंच भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढत आहे. बांधकाम बंदीच्या नियमांचे योग्य पालन होत नसल्याने धोकादायक भागात मानवी वस्त्या वाढत आहेत.
नेपाळचा उत्तर भाग: नद्यांच्या काठी वस्त्या, हॉटेल्स आणि पर्यटन सुविधा वाढल्या आहेत. पोखरा, अन्नपूर्णा क्षेत्र तसेच बुढी गंडकी, त्रिशूली आणि मोदी नद्यांचा आसपासचा परिसर.
आग्नेय तिबेट: हिमालयीन नद्या आणि हिमनद्यांच्या तलावांच्या परिसरात बांधकामे वाढली आहेत. येथे अचानक येणाऱ्या महापुराचा धोका आहे.
उत्तराखंड: नदीकाठ व अरुंद डोंगर दऱ्यांमध्ये घरे, हॉटेल्स व इतर बांधकामे झाली आहेत. पूरप्रवण क्षेत्रात होणाऱ्या अनियोजित बांधकामांबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
हिमनद्यांचे तलाव: या अभ्यासात १,३६० तलावांच्या आसपासचा परिसर होता. हे तलाव फुटल्यास सखल भागात अचानक महापूर येऊ शकतो.