पुणे ग्रँड टूर 2027 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी पॅकेज वनमधील रस्ते विकासकामांची पाहणी केली. बाणेर
.
बाणेर रस्त्यावरील यशदा ते गणराज चौक या भागातील कामांची त्यांनी पाहणी केली. ब्रेमेन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खडकी रेल्वे स्टेशन ते एबीआयएल चौक आणि गणेशखिंड रस्त्यावरील डांबरीकरण, फुटपाथ आणि इतर सुविधांच्या कामांची माहितीही त्यांनी घेतली. डांबरीकरण करताना चेंबरची उंची रस्त्याच्या पातळीनुसार ठेवावी आणि फुटपाथची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व कामांचा वेग वाढवण्यासही त्यांनी सांगितले.
मेट्रोच्या खांबांना रंग देऊन त्यांचे सुशोभीकरण करावे. मेट्रो मार्गाखालील रस्त्यांचे दुभाजक एका सरळ रेषेत आणून रस्ते सुटसुटीत आणि व्यवस्थित करावेत, असेही राम म्हणाले. पुणे ग्रँड टूरसाठी शहरातील प्रमुख रस्ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दर्जानुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. यासाठी डांबरीकरण, पदपथ, दुभाजक आणि इतर सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे महापालिकेसमोर आव्हान आहे.

पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, उपायुक्त तुषार बाबर आणि अविनाश सपकाळ उपस्थित होते. महापालिका, पीएमआरडीए, मेट्रो, पीआयटीसीएमआरएल आणि महावितरणचे अधिकारीही उपस्थित होते. गणेश कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार आणि पेवटेक कंपनीचे तज्ज्ञ सल्लागारही पाहणीवेळी होते.