Headlines

अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांचा मफलर पोस्टर:मुश्रीफ म्हणाले, ‘16 तारखेनंतर बोलू’




राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात पुन्हा एकदा मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुण्यातील डेक्कन परिसरात मफलरचे चित्र असलेले पोस्टर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पोस्टरमधून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, 16 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पोस्टरवरून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. हसन मुश्रीफ यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेवर उपरोधिक भाष्य केले. ते म्हणाले, “रोहित पवार हे महान नेते आहेत. त्यांनी कुठलातरी शोध लावला होता. ते मागच्या 10 तारखेलाच काहीतरी स्पष्ट करणार होते. आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर त्यांनी मफलर लटकवला आहे. 16 तारखेनंतर ते काय सांगतात, हे पाहू. त्यानंतर आपण यावर बोलू.” असे म्हणत त्यांनी रोहित पवारांच्या आगामी पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांच्या विमान अपघातावरून पुन्हा प्रश्न उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, त्यामागे काही वेगळे कारण होते का आणि या प्रकरणातील सर्व बाबी समोर आल्या आहेत का, असे प्रश्न रोहित पवार यांनी यापूर्वीही उपस्थित केले आहेत. आता रोहित पवार यांच्या संदर्भाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुण्यातील डेक्कन परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पोस्टरमध्ये मफलरचे चित्र दाखवण्यात आले असून, अजित पवार यांच्या विमान अपघातामागील सूत्रधारांना पाठीशी घालणारा नेता नेमका कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टरवरील मफलर कोणत्या राजकीय नेत्याकडे निर्देश करतो, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. 16 नोव्हेंबरला रोहित पवार काय खुलासा करणार? रोहित पवार हे 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी मांडल्या जाण्याची शक्यता आहे. पोस्टरमध्ये ’16 नोव्हेंबरला कोणता राजकीय बॉम्ब फुटणार?’ असा उल्लेख करण्यात आल्याने या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या पोस्टरमधील मफलरच्या चित्रामुळे एका विशिष्ट नेत्याला लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या संदर्भात रोहित पवार नेमके कोणते पुरावे किंवा माहिती समोर आणणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच या प्रकरणातील पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दाही चर्चेत दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरही हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्र येण्याबाबत वेगवेगळी वक्तव्ये समोर येत आहेत. मात्र, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. सुप्रिया सुळे यांनीही हा प्रश्न निकाली निघाल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांची मते वेगवेगळी आहेत. त्यामुळे सध्या विलिनीकरणाचा विषय पुढे जाण्याची शक्यता दिसत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. अजितदादांच्या कामांना त्यांचे नाव देण्याची मागणी करणार अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीत केलेल्या कामांचा उल्लेख करत मुश्रीफ यांनी त्यांच्या नावाचा मुद्दाही उपस्थित केला. अजितदादांनी केलेल्या विविध कामांना त्यांचे नाव देण्यास काहीही हरकत नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. एकीकडे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार कोणती माहिती समोर आणणार, याबाबत उत्सुकता आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील राजकीय भूमिकांवरही चर्चा सुरू आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबरची रोहित पवार यांची पत्रकार परिषद आणि त्यानंतर उमटणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया महत्त्वाच्या ठरणार आहेत.
हेही वाचा…. जालन्यात कीर्तनानंतर मठात परतलेल्या महाराजांचा संशयास्पद मृत्यू:खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह, मोबाईल गायब जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका महाराजांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेले ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज (वय 41) रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले. पाताळेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या राहत्या खोलीत भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल फोनही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच वाढले असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *